Manoj Jarange : “…तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद झाला पाहिजे”; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
Manoj Jarange : जरांगे यांनी मराठा समाजाला संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकार मराठा समाजाची अडवणूक करत असल्याचा आरोप करत जरांगे यांनी मराठा समाजाला संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.
सरकारला 12 तारखेपर्यंतचा वेळ दिला असून त्या दिवशी सर्व मराठ्यांनी अंतरवाली सराटीमध्ये यावे. पुढील आंदोलनाची दिशा ठरवून सरकारचा माज उतरवण्यासाठी सर्वांनी मुंबईकडे निघायचे आहे, मुंबईत एकाच जरी रक्त निघालं तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद झाला पाहिजे, असे म्हणत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला.
येत्या 12 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजाने उपस्थित राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं. “12 तारखेला सर्व मराठ्यांनी अंतरवालीमध्ये यायचे. सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, नगर, नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावागावातील मराठ्यांनी अंतरवालीमध्ये या. आता आंदोलकांनी आले नाही तरी चालेल, पण 12 तारखेला या. 10 लोक असले तरी मुंबईकडे जायचं,” असं त्यांनी सांगितलं. (Manoj Jarange)
मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर आंदोलकांवर पोलिसांमार्फत कारवाई घडवून आणण्याचा कट आहे. अशा प्रकारची कारवाई झाल्यास त्याची राजकीय जबाबदारी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर येईल. या कटामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित काही व्यक्ती सहभागी असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. (Manoj Jarange)
पुढे मनोज जरांगे म्हणाले, “मुंबईतील आंदोलनादरम्यान जर कोणत्याही एका मराठा आंदोलकाचे डोके फुटले किंवा प्रशासनाने अन्याय केला, तर १० मिनिटांत संपूर्ण महाराष्ट्र बंद पाडला जाईल. तसेच मुंबईकडे जात असताना जर सरकारने आंदोलकांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला, तर आपापल्या शहरातून जाणारे रस्ते आणि रेल्वे पूर्णपणे बंद पाडू.”
शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप (Manoj Jarange)
राज्य सरकारवर निशाणा साधताना जरांगे म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून प्रचंड निष्काळजीपणा सुरू आहे. हे केवळ शिंदे आणि फडणवीस यांची मिळीभगत असून ते मराठ्यांना फसवण्याचे काम करत आहेत. पोलिसांचा यात काहीही दोष नाही, सर्व दोष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे.पूर्णपणे शांततेच्या मार्गाने मुंबईत प्रवेश केला जाईल. पोलिसांनी त्रास दिला तरी त्यांना उलट त्रास द्यायचा नाही. पोलिसांनी अचानक हल्ला केला तर कोणीही घाबरून पळू नये, ज्यामुळे चेंगराचेंगरी होणार नाही. सरकारच्या या धोरणामुळे मराठा समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे,” असे जरांगे म्हणाले.
अंबादास दानवेंनी घेतली जरांगेंची भेट
दरम्यान, आज शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत इच्छाशक्ती दाखवावी, कारण मागण्या मान्य न झाल्यास जनतेच्या भावनांचा विस्फोट होऊ शकतो. सरकार कोणाच्या तरी दबावाखाली जाणीवपूर्वक या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी यावेळी केला.
हेही वाचा:






