Indian Women’s Hockey: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा! सलीमा टेटेकडे सोपवली संघाची धुरा
Indian Women's Hockey : हॉकी इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. सलीमा टेटे कर्णधार असेल आणि संघ २६ मे पासून चार सामन्यांची मालिका खेळेल.

Indian Womens Hockey Team Squad Announce : हॉकी इंडियाने सोमवारी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी १८ सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघाची अधिकृत घोषणा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ सामन्यांची द्विपक्षीय मालिका खेळवली जाणार असून, २६ मे पासून या मालिकेला सुरुवात होईल. १५ ते २१ जून दरम्यान ऑकलंड येथे होणाऱ्या आगामी ‘एफआयएच हॉकी विमेन्स नेशन्स कप २०२५-२६’ च्या पार्श्वभूमीवर हा ऑस्ट्रेलिया दौरा भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
पर्थमध्ये रंगणार सर्व सामने –
या मालिकेतील सर्वच्या सर्व चार सामने पर्थ हॉकी स्टेडियमवर खेळवले जातील. पहिला सामना २६ मे, दुसरा २७ मे, तिसरा २९ मे आणि अंतिम सामना ३० मे रोजी खेळवला जाणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारतीय संघाने दोन विजय मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यानंतर बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) केंद्रात भारतीय महिला खेळाडू कसून सराव करत आहेत.
सलीमा टेटेकडे नेतृत्वाची धुरा –
Ready for the Australian challenge 🇮🇳🏑🇦🇺
Young talent 🤝 Experienced core 🇮🇳
Here’s the Indian Senior Women’s Squad for the Tour of Australia 2026, set to take place in Perth from May 26–30. 🔥👊#HockeyIndia #IndiaKaGame #AUSvIND pic.twitter.com/bSgJs49dcm
— Hockey India (@TheHockeyIndia) May 18, 2026
२०२२ च्या राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमधील कांस्यपदक विजेती सलीमा टेटे या दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तिच्या जोडीला सविता, सुशीला चानू, लालरेमसियामी आणि नवनीत कौर यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा अनुभव असेल. तर सोनम, हिना बानो आणि लालथंतलुआंगी यांसारख्या युवा प्रतिभांनाही संघात स्थान मिळाले आहे. शिल्पी डबास आणि लालथंतलुआंगी यांना पहिल्यांदाच सीनियर संघात संधी मिळाली आहे, तर दीपिका सोरेंग आणि सोनम या अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत. फॉरवर्ड लाईनची धुरा फॉर्मात असलेल्या नवनीत कौरकडे असेल.
ऑस्ट्रेलिया २०२६ दौऱ्यासाठी भारताचा २२ सदस्यीय संघ:
- गोलरक्षक : सविता, बिचू देवी खरीबम
- बचावपटू: निक्की प्रधान, इशिका चौधरी, सुशीला चानू पुखरामबम, लालथंथलुआंगी, ज्योती, शिल्पी दाबस
- मिडफिल्डर: सलीमा टेटे, लालरेमसियामी, नेहा, साक्षी राणा, सुनीता टोप्पो, दीपिका सोरेंग, सोनम
- फॉरवर्डः नवनीत कौर, बलजीत कौर, दीपिका, अन्नू, इशिका, हीना बानो, रुतुजा दादासाहेब पिसाळ





