IPL 2026 : समान गुण अन् सारखाच रनरेट; तरीही चेन्नईच्या खाली राजस्थान कशी? आयपीएल पॉइंट्स टेबलमधील ‘त्या’ गणिताने चाहते चक्रावले!
IPL 2026 : सीएसके आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचे गुण आणि नेट रनरेट अगदी सारखाच दिसत असतानाही चेन्नईला राजस्थानच्या वर स्थान देण्यात आले आहे.

IPL 2026 Points Table Confusion about CSK RR : आयपीएल २०२६ चा थरार आता एका अशा टप्प्यावर पोहोचला आहे, जिथे प्लेऑफच्या शर्यतीत प्रत्येक धाव आणि प्रत्येक चेंडूचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. गुणतालिकेत (पॉइंट्स टेबल) अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्वच संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. दरम्यान, गुणतालिकेतील एका अजब गणितामुळे सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. सीएसके आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचे गुण आणि नेट रनरेट अगदी सारखाच दिसत असतानाही चेन्नईला राजस्थानच्या वर स्थान देण्यात आले आहे. यामुळे सोशल मीडियावर “हे कसं शक्य आहे?” अशी चर्चा सुरू झाली आहे.
चेन्नई पाचव्या तर राजस्थान सहाव्या स्थानावर!
सध्या आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स पाचव्या स्थानावर असून राजस्थान रॉयल्स सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी १२-१२ सामने खेळले असून दोघांच्याही खात्यात ६ विजय आणि ६ पराभवांसह १२-१२ गुण जमा आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अधिकृत पॉइंट्स टेबलमध्ये दोन्ही संघांचा नेट रनरेट (NRR) देखील सारखाच म्हणजेच ‘०.०२७’ असा दाखवला जात आहे. यामुळेच चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
दशांश चिन्हामागील ‘ते’ गुपित!
या संभ्रमामागील मुख्य कारण असे की, आयपीएलच्या अधिकृत गुणतालिकेत नेट रनरेट केवळ तीन दशांश (Three Decimals) अंकांपर्यंतच दाखवला जातो. मात्र, जेव्हा या दोन्ही संघांच्या रनरेटची खरी आकडेवारी पाहिली, तेव्हा मूळ सत्य समोर आले. राजस्थान रॉयल्सचा वास्तविक नेट रनरेट ०.०२६७०८४८४२०७७६२५८ असा आहे, तर चेन्नई सुपर किंग्सचा वास्तविक नेट रनरेट ०.०२७०२४७६९५४१५१२९ इतका आहे. म्हणजेच अत्यंत सूक्ष्म अशा फरकाने चेन्नईचा नेट रनरेट राजस्थानपेक्षा सरस आहे. याच कारणामुळे चेन्नईला गुणतालिकेत वरचे स्थान मिळाले आहे.
राजस्थानसाठी ‘करो या मरो’ परिस्थिती –
प्लेऑफच्या दृष्टीने विचार केल्यास दोन्ही संघांसाठी आगामी सामने ‘करा किंवा मरा’ असेच असणार आहेत. राजस्थान रॉयल्सने गेल्या काही सामन्यांत सलग तीन पराभव पत्करले आहेत, तरीही संघ शर्यतीत कायम आहे. राजस्थानला अंतिम चारमध्ये पोहोचायचे असल्यास त्यांचे उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. राजस्थानचा पुढील महत्त्वाचा सामना १९ मे रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध (LSG) होणार असून, या सामन्याच्या निकालावर प्लेऑफचे संपूर्ण समीकरण अवलंबून असणार आहे.






