Top 10 Sports News : रोनाल्डोची निवृत्ती ते सूर्या कॅप्टन्सी! एका क्लिकवर वाचा क्रीडा जगतातील टॉप-१० सर्वात मोठ्या घडामोडी
Top 10 Sports News : टॉप-१० क्रीडा बातम्यांमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोची निवृत्ती, विराट कोहलीचा विक्रम, सूर्यकुमार यादवचे कर्णधारपद आणि प्रमुख क्रीडा कामगिरी यांचा समावेश आहे.

Top 10 Sports News Today १. ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, २३ वर्षांच्या ऐतिहासिक कारकिर्दीला पूर्णविराम
पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने २३ वर्षांच्या ऐतिहासिक कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. नोव्हेंबरच्या आंतरराष्ट्रीय ब्रेकनंतर तो आपली प्रसिद्ध ७ नंबरची जर्सी संघाकडे सोपवेल. २००३ मध्ये पदार्पण करणाऱ्या रोनाल्डोने देशासाठी २३४ सामन्यांत विक्रमी १४६ गोल डागले आहेत. सलग ६ वेगवेगळ्या फिफा विश्वचषकांत खेळणारा व गोल नोंदवणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केल्यानंतर आता क्लब फुटबॉलद्वारे करिअरमधील १००० गोलांचा टप्पा पूर्ण करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे.
२. सूर्यकुमार यादवसाठी गूड न्यूज; भारतीय संघातून वगळल्यानंतर मुंबईने सोपवले कर्णधारपद
खराब फॉर्ममुळे भारतीय टी-२० संघातून बाहेर पडलेल्या सूर्यकुमार यादवसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी या दोन्ही देशांतर्गत व्हाईट बॉल स्पर्धांसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) सूर्याकडे कर्णधारपद सोपवले जाणार आहे. १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेसाठी ९ नोव्हेंबरला अंतिम संघाची घोषणा केली जाईल. भारताला २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्याला मुंबईचे नेतृत्व करताना पुन्हा राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
३. आयपीएल रिटेंशनपूर्वी मोठा धमाका! चेन्नई आणि हैदराबादमध्ये चार खेळाडूंची झाली अदलाबदल
आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात चार खेळाडूंची मोठी ट्रेड डील पूर्ण झाली आहे. या करारानुसार इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन आणि ऑस्ट्रेलियाचा जॅक एडवर्ड्स चेन्नईत दाखल झाले आहेत. चेन्नईत येताना लिव्हिंगस्टोनच्या पगारात थेट ६ कोटी रुपयांची कपात झाली आहे. दुसरीकडे, भारताचा वेगवान गोलंदाज खलील अहमदची हैदराबादमध्ये घरवापसी झाली असून ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन एलिसही आता सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसेल.
४. राजकुमारी लांचेनबी चानूने यूथ ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास; वुशू खेळात भारताला जिंकून दिले पहिले पदक
मणिपूरच्या युवा वुशू खेळाडू राजकुमारी लांचेनबी चानूने यूथ ऑलिम्पिक २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत भारतासाठी पहिले कास्यपदक पटकावले. महिला चांगक्वान संयुक्त स्पर्धेत तिने गुन्शू आणि चांगक्वान प्रकारात मिळून एकूण १८.०३९ गुण मिळवले. यूथ ऑलिम्पिकमध्ये वुशूचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला असून, पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवले. या पदकासह भारताच्या खात्यात १ रौप्य आणि २ कास्य अशी एकूण ३ पदके जमा झाली असून, यात ज्युडो आणि जलतरणातील पदकांचाही समावेश आहे.
५. विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिलाच खेळाडू
न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने नवा इतिहास रचला. लक्ष्याचा पाठलाग करताना १२ धावा पूर्ण करताच विराटने तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करताना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३ हजार धावांचा टप्पा ओलांडला. हा पराक्रम करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरनंतर एकाच क्रमांकावर १३ हजार धावा करणारा तो दुसरा फलंदाज बनला. यासह त्याने ऑकलंडच्या मैदानात स्लिपमध्ये अप्रतिम झेल टिपत क्षेत्ररक्षणातही चुणूक दाखवली.
६. एका मीममुळे किलियन एम्बाप्पेची चीनमध्ये कोंडी; मागितली जाहीर माफी
फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पेने एका टॉक शोमध्ये चीनचे दिवंगत नेते माओ त्से तुंग यांचा ‘चीनचा हुकूमशहा’ असा उल्लेख केल्याने आंतरराष्ट्रीय वाद पेटला आहे. या विधानामुळे संतापलेल्या चीनमध्ये डोंगपाँग आणि मेंगनियूसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी त्याचे कोट्यवधींचे करार रद्द केले. तसेच सरकारी ब्रॉडकास्टर CCTV ने रिअल माद्रिदच्या सामन्यांच्या प्रक्षेपणावर बंदी घातली. अखेर वाढत्या दबावामुळे एम्बाप्पेने तीन भाषांमध्ये अधिकृत माफी मागितली, मात्र तरीही चिनी माध्यमांमध्ये त्याच्याविरोधातील रोष कायम आहे.
७. लक्ष्य सेनने रचला इतिहास! जोनाथन ख्रिस्तीचा धुव्वा उडवत पटकावले हायलो ओपनचे जेतेपद
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने अखेर जेतेपदाचा दुष्काळ संपवत हायलो ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावरील इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीचा २१-१७, २१-१० असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवला. या विजयासह दोनदा हायलो ओपन जिंकणारा लक्ष्य पहिलाच भारतीय ठरला आहे. २०२१ नंतर त्याने हे दुसरे विजेतेपद मिळवले. महिला एकेरीत पीव्ही सिंधू आणि पुरुष एकेरीत लक्ष्य सेन यांनी विजेतेपद जिंकल्याने हायलो ओपनमध्ये भारताने दुहेरी यश मिळवत तिरंगा फडकवला.
८. पहिल्यावहिल्या कॉमनवेल्थ कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये भारताचे वर्चस्व, पटकावला दुहेरी मुकुट
पहिल्या कॉमनवेल्थ कबड्डी चॅम्पियनशिप २०२६ च्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष संघाने श्रीलंकेचा ५४-२० असा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. महिला संघानेही युगांडाचा ३५-१५ असा पराभव करत सुवर्ण जिंकल्याने भारताने दुहेरी मुकुट संपादन केला. भारताकडून आदित्य शिंदेने १० गुणांसह ‘सुपर टेन’, भरत हुड्डाने ८ गुण आणि योगेश दहियाने डिफेन्समध्ये ५ टॅकल पॉईंट्स मिळवत ‘हाय-5’ नोंदवला. संपूर्ण स्पर्धेत सलग ८ सामने जिंकत अपराजित राहिलेल्या भारताने जागतिक कबड्डीवरील आपले एकतर्फी वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.
९. भारतीय कुस्तीत ऐतिहासिक सुवर्णक्षण; मनीषा भानवाला ठरली पहिली महिला वर्ल्ड चॅम्पियन
कझाकस्तानमधील अस्ताना येथे पार पडलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत २९ वर्षीय मनीषा भानवाला हिने ५९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला. सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारी ती भारताची पहिलीच महिला पैलवान ठरली आहे. अंतिम सामन्यात ०-६ ने पिछाडीवर असतानाही तिने अमेरिकेच्या खेळाडूला ८-६ ने पराभूत केले. २०२२ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतरही न डगमगता तिने हे स्वप्न पूर्ण केले.
१०. गिलने पहिल्या वनडेत डोळ्याच्या बाजूला लावलेलं डिव्हाइस नेमकं काय अन् त्याचा फायदा काय?
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या डोळ्याच्या बाजूला चिटकवलेल्या एका सोनेरी फिटनेस डिव्हाइसने सर्वांचे लक्ष वेधले. हे खास उपकरण ‘TEMPLE’ असून ते झोमॅटोचे सह-संस्थापक दीपिंदर गोयल यांच्या हेल्थ-टेक स्टार्टअपने विकसित केले आहे. ८४,९९९ रुपये किंमत असलेले हे गॅझेट पीपीजी (PPG) तंत्रज्ञानाद्वारे थेट मेंदूतील रक्तप्रवाह, मानसिक ताण आणि खेळाडूची एकाग्रता अचूक ट्रॅक करते. १ नोव्हेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झालेले हे अत्याधुनिक डिव्हाइस सध्या क्रीडा विश्वात चर्चेत आहे.





