Mbappe China Controversy : फुटबॉल कोर्टवरून थेट आंतरराष्ट्रीय वाद! एका मीममुळे किलियन एम्बाप्पेची चीनमध्ये कोंडी; मागितली जाहीर माफी
Mbappe China Controversy : फ्रेंच फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पेने माओ त्से तुंग यांचा हुकूमशहा म्हणून केलेल्या उल्लेखावरून चीनमध्ये खळबळ उडाली आहे.

Kylian Mbappe China Mao Zedong Controversy Real Madrid Apology : फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर आणि रिअल माद्रिदचा प्रमुख खेळाडू किलियन एम्बाप्पे एका राजकीय विधानामुळे आंतरराष्ट्रीय वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका फ्रेंच टॉक शोदरम्यान चीनचे दिवंगत सर्वोच्च नेते माओ त्से तुंग यांचा ‘चीनचा हुकूमशहा’ असा उल्लेख करणे एम्बाप्पेला चांगलेच महागात पडले. या विधानामुळे संतापलेल्या चीनने त्याच्याविरोधात थेट बहिष्कार टाकला, ज्यामुळे एम्बाप्पेला कोट्यवधी रुपयांचे प्रायोजकत्व गमवावे लागले असून, स्थानिक माध्यमांनी त्याला काळ्या यादीत टाकले. वाढत्या दबावानंतर अखेर एम्बाप्पेने अधिकृत लेखी माफीनामा जारी केला आहे.
एका मीमवरील विनोदाने पेटवला आंतरराष्ट्रीय वाद –
हा वाद ऑक्टोबर २०२६ च्या अखेरच्या आठवड्यात सुरू झाला, जेव्हा एम्बाप्पेची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली. टॉक शोमध्ये त्याच्यावरील मीम्सबद्दल विचारले असता, त्याने हसत म्हटले की त्याच्या चेहऱ्यावरील सर्वात मजेदार मीम तो होता, ज्यात त्याचा चेहरा एका व्यक्तीच्या शरीरावर जोडला गेला होता; पुढे त्याने ‘कदाचित तो चीनचा कोणीतरी हुकूमशहा होता’ असे वक्तव्य केले. प्रत्यक्षात तो मीम माओ त्से तुंग यांच्या छायाचित्राशी जोडलेला होता. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक माओ यांना अत्यंत संवेदनशील राष्ट्रीय प्रतीक मानले जात असल्याने या विधानाने तिथे संतापाची लाट उसळली.
चिनी कंपन्यांनी रद्द केले कोट्यवधींचे करार –
View this post on Instagram
एम्बाप्पेच्या या वक्तव्याविरोधात चिनी बाजारपेठेत तीव्र पडसाद उमटले. चीनमधील आघाडीची बेव्हरेज कंपनी ‘डोंगपाँग’ आणि प्रसिद्ध डेअरी ब्रँड ‘मेंगनियू’ यांनी एम्बाप्पेसोबत असलेले कोट्यवधी रुपयांचे जाहिरात करार तात्काळ रद्द केले. देशाचा स्वाभिमान आणि राष्ट्रीय अस्मितेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा देत या कंपन्यांनी त्याला मोठा आर्थिक झटका दिला.
रिअल माद्रिद आणि ला लीगाच्या प्रक्षेपणावर चीनमध्ये बंदी –
View this post on Instagram
केवळ ब्रँड करारांवरच हे थांबले नाही, तर चीनचा सरकारी ब्रॉडकास्टर CCTV आणि आघाडीचे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ‘मिगू’ यांनी एम्बाप्पेचा स्पॅनिश क्लब रिअल माद्रिद आणि ला लीगाच्या सर्व सामन्यांच्या प्रक्षेपणावर थेट बंदी घातली. यामुळे स्पॅनिश फुटबॉलचे चिनी बाजारपेठेतील प्रचंड मोठे व्यावसायिक नुकसान झाले. या गंभीर परिस्थितीनंतर रिअल माद्रिद आणि ला लीगा संघटना यांनीही चीन सरकारची जाहीर माफी मागितली.
एम्बाप्पेकडून तीन भाषांत माफीनामा; चीनचा आक्रमक पवित्रा कायम –
चौफेर कोंडी झाल्यानंतर एम्बाप्पेने चिनी, इंग्रजी आणि फ्रेंच अशा तीन भाषांमध्ये अधिकृत माफी मागितली. “चीनची संस्कृती, इतिहास किंवा लोकांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. माझे वक्तव्य अपुऱ्या माहितीवर आधारित होते; मी चिनी चाहत्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो,” असे त्याने स्पष्ट केले. तरीही चिनी प्रशासन आणि प्रसारमाध्यमांचा रोष कायम असून, प्रक्षेपणावरील निर्बंध इतक्यात हटण्याची शक्यता कमी दिसत आहे.





