जन आक्रोश मोर्चात निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

अकोले –3 सप्टेंबर पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा आढळा कृती समितीने आज दुपारी जन आक्रोश मोर्चा प्रसंगी दिला.

कृष्णवंती नदीचे पाणी आढळा खोऱ्यात आणावे, बिताका प्रकल्पाच्या कामाचा पाठपुरावा करून उर्वरित कामाला सुरुवात करावी, नदी, ओढे, नाले यांची पुनर्बांधणी करावी, बंधाऱ्यांची दुरुस्ती व्हावी, सांगवी धरणातील पाण्याच्या आवर्तनाच्या तारखा निश्‍चित असाव्यात, आढळा प्रकल्पातील गाळ उपसा करावा, आदी प्रमुख मागण्यांसाठी आढळा कृती समितीच्यावतीने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी हा इशारा देण्यात आला.

अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्‍यांतील आढळा धरणाच्या 21 गावांतील लाभार्थी मोर्चात सहभागी झाले होते. अकोले येथील बसस्थानक परिसरापासून हा मोर्चा सुरू झाला. मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी आपल्या मागण्यांच्या घोषणा देत तहसीलदार कार्यालय गाठले. यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आढळा कृती समितीचे प्रर्वतक अक्षय बोंबले यांनी निवेदनाचे वाचन केले.

शुभम आंबरे, जालिंदर बोडके, सुनील उगले, अनिल आंबरे, भूषण वाकचौरे, गणपत दातीर, नानासाहेब दळवी, अंकुश थोरात आदींनी मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास निवडणुकांवर 21 गावांकडून बहिष्कार घातला जाईल, असा इशारा दिला. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष लालूशेठ दळवी, डॉ. किरण लहामटे, अंजनाताई बोंबले, भीमाजी तोरमल, मारुती रेवगडे, माधव रेवगडे, राजेंद्र आंबरे, बाबासाहेब उगले, उपसरपंच अशोक उगले, संतोष आंबरे, रामदास शिंदे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब दातीर उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×