TOP 10 News: जिल्हा बँकांतील नोकरीत आता भूमिपुत्रांना प्राधान्य ते विजय यांच्या शपथविधीला पुन्हा ब्रेक?; जाणून घ्या आजच्या Top 10 News
TOP 10 News : राज्य, देश, विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोड...

TOP 10 News: १. जिल्हा बँकांतील नोकरीत आता भूमिपुत्रांना प्राधान्य
राज्य सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकरभरतीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे जिल्हा बँकांमधील रिक्त पदांच्या भरतीमध्ये संबंधित जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना ७० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. उर्वरित ३० टक्के जागांवर जिल्ह्याबाहेरील उमेदवार अर्ज करू शकतील. राज्यात सध्या ३१ जिल्हा बँका कार्यरत असून, त्या प्रामुख्याने शेतकरी आणि ग्रामीण संस्थांशी जोडलेल्या आहेत.
बँकिंग सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्थानिक बोलीभाषा, भौगोलिक परिस्थिती आणि ग्रामीण प्रश्नांची जाण असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन सरकारने संबंधित बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी ‘डोमिसाइल’ प्रमाणपत्र धारक उमेदवारांना संधी देण्याचे धोरण निश्चित केले आहे. या निर्णयामुळे स्थानिक सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून, बँकांच्या सभासदांना आणि ग्राहकांना अधिक दर्जेदार व सुलभ सेवा मिळण्यास मदत होणार आहे. सरकारचा हा बदल ग्रामीण विकासाला गती देणारा ठरेल.
२. सीएनजीच्या दरात वाढ
सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, तळगाव आणि हिंजवडी परिसरात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन दर आज ९ आणि ९ मे २०२६ च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. सीएनजीच्या दरवाढीनंतर प्रति किलो दर ९२.२५ रुपयांवर पोहोचला आहे. नैसर्गिक वायूच्या वायूच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आल्याचे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिडेटने स्पष्ट केलं आहे. मात्र पीएनजीच्या दरात न वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे.
३. ऐकू येत नसतानाही नागपूरच्या शांभवीची दहावीत उत्तुंग भरारी
मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शांभवीने १० वीच्या परिक्षेत मोठे यश मिळवले आहे. लहानपणी आजारपणामुळे ऐकण्याची क्षमता गेल्याने केवळ ओठांच्या हालचालींवरून शिक्षण घेत शांभवीने दहावीच्या परीक्षेत तब्बल 94.2 टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे. तिच्या या यशामागे आई-वडिलांचे योगदानही मोठे आहे. त्यांनी शांभवीला सामान्य मुलांच्या शाळेत ठेऊन मुलीला सक्षम बनवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
शांभवीने देखील हार न मानता शिक्षक आणि पालकांच्या मदतीने ‘लिप रीडिंग’ अर्थात ओठांच्या हालचाली समजून अभ्यास करण्याची पद्धत आत्मसात केली. वर्गात शिक्षक काय शिकवतात हे ती त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि ओठांच्या हालचालींवरून समजून घेत. नियमित सराव, अभ्यासातील सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर शांभवीने हे यश मिळवले.
४. अष्टविनायक दर्शनाला जाताय? प्रसिद्ध ३ मंदिरे महिनाभर बंद
अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत तसेच पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जतन, संवर्धन व दुरुस्ती कामांच्या पार्श्वभूमीवर मोरगावचे श्री मयुरेश्वर, थेऊरचे श्री चिंतामणी आणि सिद्धटेकचे श्री सिद्धिविनायक मंदिरे रविवार (दि. १०) पासून सुमारे महिन्याभरासाठी भाविकांसाठी बंद राहणार आहेत, साधारण ९ जूनच्या कालावधीत ही मंदिरे पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाने दिली.
विभागाकडून मंदिरांचा मुख्य गाभारा आणि सभामंडप यांचे पौराणिक स्वरूप जपत सुबक दगडी बांधकामाद्वारे संवर्धन करण्यात येणार आहे. या कामादरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती कामात अडथळा निर्माण करू शकते तसेच, कामाचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
५. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी
पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा दारूण पराभव करत सत्ता खेचून आणली. त्यानंतर सुवेंदू अधिकारी यांची भाजप विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड झाली आहे. त्यांच्या नावाची घोषणा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.
यानंतर आज पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथील ब्रिगेड परेड ग्राउंड या ठिकाणी सकाळी ११ वाजता सुवेंदू अधिकारी यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल मुख्यमंत्री पदाची शपथ देणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे काही आमदार मंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली असून, सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित २० राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
६. विजय यांच्या शपथविधीला पुन्हा ब्रेक?
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या तमिळगा वेत्री कळघम आणि त्यांचे नेते थलपती विजय याच्यासाठी सत्तेचे स्वप्न तूर्तास अधांतरी राहिले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या ११८ आमदारांच्या पाठिंब्याचा लेखी पुरावा नसल्याने राज्यपाल आर. व्ही. आर्लेकर यांनी विजय याला मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीकेकडे सध्या 116 आमदारांचा पाठिंबा आहे. मात्र अजूनही बहुमातासाठी 2 आमदारांची गरज आहे. काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. तर डाव्या पक्षांनीही विजय यांना पाठिंबा दिला. मात्र व्हीसीकेच्या समर्थनाशिवाय सरकार स्थापन करणे शक्य नसल्याचं स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विजय थलपती होणार का? हा प्रश्न अद्यापही कायम आहे.
७. ‘हंताव्हायरस’ची एन्ट्री! WHO कडून १२ देशांना अलर्ट
अर्जेंटिनाहून निघालेल्या ‘एमव्ही होंडियस’ या डच जहाजावर हंताव्हायरसचा संसर्ग पसरल्याने जागतिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या जहाजावरील काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या जहाजावर आतापर्यंत ८ संशयास्पद रुग्ण आढळले असून, त्यापैकी ५ जणांना हंताव्हायरसची बाधा झाल्याची पुष्टी झाली आहे, तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने ही स्थिती कोविड-१९ सारखी महामारी नसून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सेंट हेलेना या ब्रिटिश प्रदेशात या क्रुझ शिपमधील काही नागरिक उतरले होते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने 12 देशांमध्ये अलर्ट जारी केला आहे. हा विषाणू प्रामुख्याने उंदरांच्या विष्ठा, लाळ किंवा लघवीच्या संपर्कात आल्याने पसरतो. याची सुरुवातीची लक्षणे ताप, अंगदुखी असतात. मात्र, स्थिती बिघडल्यास फुफ्फुसांमध्ये द्रव साचून श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो.
८. डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, 10 टक्के आयत शुल्क रद्द
अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले 10 टक्के टॅरिफ 1974 च्या व्यापार अधिनियमाच्या कलम 122 नुसार कायदेशीर दृष्ट्या योग्य नाही. या कारणामुळं ते रद्द करण्यात असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 फेब्रुवारी 2026 ला जगभरातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के टॅरिफ लावलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर विविध देशांवर टॅरिफ लादलं होतं.
ते टॅरिफ सुप्रीम कोर्टानं रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकन सुप्रीम कोर्टानं टॅरिफ रद्द केल्यानंतर ट्रम्प यांनी 10 टक्के टॅरिफ लादलं होतं. ट्रम्प यांनी 10 टक्के टॅरिफ लादल्यानंतर 24 राज्ये आणि काही छोट्या व्यापारांनी ट्रम्प यांच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. आता फेडरल कोर्टानं ट्रम्प यांचं 10 टक्के टॅरिफ रद्द केलं आहे.
९. टीम इंडियाला मिळणार नवा स्पिन बॉलिंग कोच
भारतीय संघात सध्या स्पिन बॉलिंग कोचची जागा रिक्त असून, या पदासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू साईराज बहुतुले यांचे नाव आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. बहुतुले यांनी गौतम गंभीर आणि बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असून त्यांची टीम इंडियाच्या स्पिन बॉलिंग कोचपदी नियुक्ती होऊ शकते. सध्या साईराज बहुतुले आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्स संघासोबत स्पिन बॉलिंग कोच म्हणून कार्यरत आहेत.
यापूर्वी 2024 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर त्यांची भारतीय संघाच्या अंतरिम गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांना कायमस्वरूपी संधी मिळाली नव्हती. मात्र आता ते टीम इंडियामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
१०. “विजय आणि त्रिशाने आता लग्न करावं”
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजयच्या पक्षाला मोठे यश मिळाले. तर दुसरीकडे अभिनेत्री त्रिशा आणि थलपती विजयच्या डेटिंगच्या चर्चांनीही जोर धरला आहे. याच दरम्यान राखी सावंतने विजय आणि त्रिशाबाबत भाष्य केले आहे. “मला वाटतं त्यांनी लग्न करावं. विजय आणि त्रिशाने लग्न करावं, आम्ही त्यांच्या मेहंदी समारंभाला जाऊ. मी आणि तृषा, दोघींनी बॉलिवूडमध्ये एकत्र सुरूवात केली होती, पण नंतर तृषा साऊथला गेली आणि तिथे चित्रपटांत काम करू लागली, असं विधान राखीने केलं.
राखीने तामिळनाडू निवडणुकीतील विजयच्या विजयाबद्दलही मत व्यक्त केलं. ती म्हणाली, “तामिळनाडूमध्ये इतक्या जागा जिंकणारे ते पहिले ख्रिश्चन आहेत. त्यामुळे, ते मला वैयक्तिकरित्या आवडतात आणि विजयसोबत एक गाणं करणे हे माझं स्वप्न होते, पण मला ती संधी मिळाली नाही. मात्र, आता मला वाटतं की मी त्यांच्या पक्षात सामील व्हायला हवे.” असं म्हणत राखीने पक्षप्रवेशाची इच्छाही व्यक्त केली.
हेही वाचा:








