Thalapathy Vijay Political Journey: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजय यांनी अभिनयातून थेट राजकारणात प्रवेश करत तमिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल घडवला आहे. २०२४ मध्ये त्यांनी ‘तमिळगा वेत्री कळगम’ या पक्षाची स्थापना केली आणि अवघ्या २७ महिन्यांत मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. त्यामुळे सध्या संपूर्ण देशात त्यांच्या राजकीय प्रवासाची चर्चा रंगली आहे. २ फेब्रुवारी २०२४ रोजी विजय यांनी सोशल मीडियावरून आपल्या पक्षाची घोषणा केली होती. त्या वेळी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांचे लक्ष्य थेट २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुका हेच होते. अभिनय क्षेत्रात मोठं नाव कमावल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ राजकारणासाठी चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. विजय यांचा ‘विजय मक्कल इयक्कम’ हा चाहतावर्ग आधीपासूनच सामाजिक कामात सक्रिय होता. पूरग्रस्तांना मदत, गरीब विद्यार्थ्यांना सहाय्य अशा उपक्रमांमुळे विजय यांची लोकांमध्ये वेगळी प्रतिमा तयार झाली. डिसेंबर २०२३ मध्ये थुथुकुडी आणि तिरुनेलवेली येथील पूरग्रस्तांसाठी त्यांनी मदतकार्य केले होते. २७ ऑक्टोबर २०२४ रोजी विक्रवंडी येथे पक्षाची पहिली मोठी सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. विजय यांनी या वेळी पारंपरिक द्रविड राजकारणावर टीका करत भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर त्यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळू लागला. Thalapathy Vijay मात्र, सप्टेंबर २०२५ मध्ये करूर येथे झालेल्या सभेत चेंगराचेंगरी झाली आणि काही लोकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे विजय यांच्यावर टीकाही झाली. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आणि पुढील सभांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडेही देण्यात आली होती. राजकीय प्रवासात विजय यांना कौटुंबिक वादांचाही सामना करावा लागला. त्यांच्या वडिलांनी वेगळा राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर विजय यांनी त्यापासून स्वतःला दूर ठेवले. आपल्या नावाचा राजकीय वापर करू नये, अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती. दरम्यान, ‘जन नायकन’ हा विजय यांचा शेवटचा चित्रपट मानला जात आहे. अनेक वाद आणि चित्रपट लीक होण्याच्या घटनेनंतर अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला. सर्व अडचणींवर मात करत विजय यांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं. आता ते तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. अभिनेता ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास सध्या भारतीय राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे.