Donald Trump : इराणच्या हल्ल्याच्या धोक्यामुळे ट्रम्प यांनी विमान बदलले होते; खाद्यपदार्थांच्या ट्रकमधून केला होता प्रवास
गेल्या महिन्यात गुप्तचर अधिकाऱ्यांनी अध्यक्ष किंवा त्यांच्या जेटवर हल्ल्याचा विशिष्ट धोका असल्याचे सूचित केल्यामुळे अतिरिक्त खबरदारी घेण्यात आली.

Donald Trump – महिन्यात तुर्कीयेवरून ब्रिटनला जाण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुपचूप आपले विमान बदलले होते. इराणबरोबरच्या संघर्षामुळे वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर अमेरिकेच्या अध्यक्षांच्या विमानाला इराणकडून लक्ष्य केले जाण्याचा धोका गुप्तचरांनी वर्तवला होता. त्यामुळे हा बदल करण्यात आला होता, असे अमेरिकेतल्या माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.
तुर्कीयेची राजधानी अंकारा येथून माध्यमांसमोर ट्रम्प एअर फोर्स वन जंबो जेट विमानात चढले होते. मात्र उड्डाणानंतर काही मिनिटातच ते एअर फोर्स सी-३२ ए या छोट्या लष्करी विमानात बसले विमानतळावरील खाद्यसेवेच्या ट्रकमधूनच ते या विमानापर्यंत गेले होते. हा ट्रक सर्वसाधारणपणे विमानात खाद्यसेवा पुरवण्यासाठी वापरला जातो, असे अमेरिकेतल्या वर्तमानपत्राने म्हटले आहे.
कतारने भेट दिलेल्या बोईंग ७४७-८ विमानातून ट्रम्प अंकारा येथील नाटो शिखर परिषदेला गेले होते. हे विमान गेल्या महिन्यात अध्यक्षांच्या विमानांच्या ताफ्यात सामील करण्यात आले होते. पण परतीच्या प्रवासासाठी एअर फोर्स वन च्या पूर्वीच्या विमानाचा वापर करणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले होते.
ट्रम्प त्यांच्यासोबत तुर्कियेहून ब्रिटनमधील हवाई तळावर गेले नव्हते, असे जुन्या एअर फोर्स वनमधील पत्रकारांना कळवण्यात आले नव्हते. त्यामुळे या पत्रकारांसाठी हा एक दिशाभूल करणारा प्रवास ठरला. जेव्हा जुन्या काळातील निळ्या-पांढऱ्या रंगाचे एअर फोर्स वन विमान अंकारा येथून ब्रिटनच्या दिशेने उड्डाण घेत होते, तेव्हा अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसने पत्रकारांना विमानाच्या खिडक्या बंद ठेवण्यास सांगितले होते.
अमेरिकेच्या अध्यक्षांच्या सुरक्षिततेसाठी अशी खबरदारी पहिल्यांदाच घेतली गेली नव्हती. यापुर्वीही २००० साली तत्कालिन अध्यक्ष बिल क्लिंटन हे भारतातून पाकिस्तानला गेले होते. तेंव्हा देखील एअर फोर्स-वन ऐवजी गल्फस्ट्रीम विमानातून गेले होते.
इराणशी संबंधित ट्रम्प यांना असलेल्या धोक्यामुळे ऐनवेळची खबरदारी घेण्यात आली आणि नियोजनाशिवाय अन्य मार्गाचा अवलंब करण्यात आला. गेल्या महिन्यात गुप्तचर अधिकाऱ्यांनी अध्यक्ष किंवा त्यांच्या जेटवर हल्ल्याचा विशिष्ट धोका असल्याचे सूचित केल्यामुळे अतिरिक्त खबरदारी घेण्यात आली, असे वृत्तामध्ये म्हटले गेले आहे.





