Isha Koppikar : “हो, मी अंधभक्त आहे.. अनफॉलो करायचं असेल तर करा”; ईशा कोप्पीकरने चांगलाच सुनावलं, अभिनेत्री सोबत नेमकं काय घडलं होत?
आंदोलन करायचं असेल तर नक्की करा; मात्र आंदोलनाचा मुद्दा आणि त्याची पद्धत महत्त्वाची आहे. सरकारला प्रश्न विचारा, आपल्या मागण्या मांडा, पण वैयक्तिक शिवीगाळ किंवा अपमानास्पद भाषा वापरू नका.

Isha Koppikar – बॉलिवूडची ‘खल्लास गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री ईशा कोप्पिकर सध्या तिच्या अभिनयामुळे नव्हे, तर तिच्या बेधडक राजकीय भूमिकेमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपर लीक आणि परीक्षा व्यवस्थेतील अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान काही ठिकाणी वापरल्या गेलेल्या अपमानास्पद भाषेवर ईशाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
सरकारला प्रश्न विचारण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र नेत्यांना शिवीगाळ करणे किंवा कोणत्याही मुद्द्याची चर्चा अपमानास्पद भाषेत करणे योग्य नसल्याचं तिने स्पष्ट केलं. तिच्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीका झाली, काही युजर्सनी अनफॉलो करण्याची धमकी दिली. पण आता ईशानेही या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलं आहे.
‘अनफॉलो करायचं असेल तर करा, मला त्याची पर्वा नाही’, असं म्हणत तिने आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. नुकतंच ईशाने ‘फिल्मीबीट’ला दिलेल्या मुलाखतीत विद्यार्थी आंदोलन, लोकशाही, सेलिब्रिटींची भूमिका आणि सोशल मीडिया ट्रोलिंग या सगळ्यांवर आपलं मत स्पष्ट केलं.
तिच्या मते, आंदोलनाला विरोध नाही; मात्र आंदोलन करताना भाषेची आणि वर्तनाची मर्यादा पाळली पाहिजे. सरकारवर प्रश्न उपस्थित करणे हा लोकशाहीचा भाग आहे, पण प्रत्येक गोष्टीला ‘तानाशाही’ म्हणणं किंवा वैयक्तिक पातळीवर शिवीगाळ करणं योग्य नाही, असं तिचं म्हणणं आहे.
ईशा म्हणाली की, आंदोलन करायचं असेल तर नक्की करा; मात्र आंदोलनाचा मुद्दा आणि त्याची पद्धत महत्त्वाची आहे. सरकारला प्रश्न विचारा, आपल्या मागण्या मांडा, पण वैयक्तिक शिवीगाळ किंवा अपमानास्पद भाषा वापरू नका, असं तिने सांगितलं.
लोकशाही म्हणजे केवळ बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, तर त्या स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही येते, अशी भूमिका ईशाने मांडली. ‘तानाशाही’ हा शब्दही अतिशय सहजपणे वापरला जाऊ नये, असं तिने म्हटलं. तिच्या मते, सरकारच्या चांगल्या कामाचं श्रेय देणं आणि चुकीच्या गोष्टींवर प्रश्न विचारणं, हे दोन्ही लोकशाहीत आवश्यक आहे.
ईशाच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका झाली आणि काही युजर्सनी तिला अनफॉलो करण्याची धमकी दिली. मात्र अभिनेत्रीने या धमकीला अजिबात भीक घातली नाही. ‘लोकांनी मला अनफॉलो केलं, तरी मला त्याचा फरक पडत नाही. काही लोक जातील, पण काही लोक माझ्यासोबत उभेही राहतील,’ अशी भूमिका तिने मांडली.
ट्रोलिंगदरम्यान काही जणांनी ईशाला ‘अंधभक्त’ असा शिक्का मारला. त्यावर अभिनेत्रीने उलट हा शब्दच स्वीकारत आपली भूमिका स्पष्ट केली. ‘हो, मी अंधभक्त आहे; पण माझ्या देशासाठी. मी भारतभक्त असल्याचा मला अभिमान आहे,’ असा आशय असलेला संदेश तिने सोशल मीडिया स्टोरीवरही शेअर केला होता.
याआधीही तिने सांगितलं होतं की, देशाबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्याला कोणत्याही लेबलची भीती वाटत नाही. ईशा कोप्पिकर २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात सहभागी झाली होती. त्यामुळे तिची राजकीय भूमिका ही केवळ सध्याच्या वादापुरती मर्यादित नसून ती याआधीपासूनच सार्वजनिकपणे राजकीय भूमिका मांडताना दिसली आहे.
‘खल्लास गर्ल’चा असा आहे बॉलिवूड प्रवास
ईशा कोप्पिकरचा जन्म १९ सप्टेंबर १९७६ रोजी मुंबईत झाला. तिने रामनारायण रुईया महाविद्यालयातून लाइफ सायन्सेसचं शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये असतानाच तिने मॉडेलिंगला सुरुवात केली आणि १९९५ च्या मिस इंडिया स्पर्धेत सहभागी होत ‘मिस टॅलेंट’चा किताब मिळवला.
तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मात्र थेट बॉलिवूडमधून झाली नाही. १९९८ मध्ये तिने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तमिळ चित्रपट ‘Kaadhal Kavithai’मधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा बेस्ट फीमेल डेब्यू पुरस्कारही मिळाला. त्यानंतर तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत काही काळ काम केलं.
हिंदी चित्रपटसृष्टीत तिची सुरुवात ‘फिजा’पासून झाली. त्यानंतर ‘प्यार इश्क और मोहब्बत’, ‘कंपनी’, ‘कांटे’, ‘दिल का रिश्ता’, ‘कयामत’, ‘पिंजर’, ‘कृष्णा कॉटेज’, ‘क्या कूल हैं हम’, ‘डॉन’, ‘डार्लिंग’, ‘हॅलो’, ‘हॅलो डार्लिंग’, ‘एक विवाह ऐसा भी’ आणि ‘शबरी’ यांसारख्या चित्रपटांत तिने विविध भूमिका साकारल्या.
दरम्यान, राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ चित्रपटातील ‘खल्लास’ या गाण्याने ईशा कोप्पिकरला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या गाण्यानंतरच तिची ओळख ‘खल्लास गर्ल’ म्हणून निर्माण झाली. पुढे ‘कांटे’मधील ‘इश्क समंदर’सारख्या गाण्यांनीही तिची ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री अशी प्रतिमा मजबूत केली.







