TOP 10 News : महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप ते महागाई भत्त्यात 20 टक्के वाढ… वाचा आजच्या टाॅप बातम्या
TOP 10 News : राजकीय भूकंप, मान्सूनचे आगमन, अण्णा हजारेंचा इशारा, पश्चिम बंगाल अर्थसंकल्प, जागतिक घडामोडी आणि तंत्रज्ञान-क्रीडा क्षेत्रातील टॉप १० महत्त्वाच्या बातम्या.

TOP 10 News : ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल; ‘ऑपरेशन टायगर’ फुलप्रूफ यशस्वी – शिंदे
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आज जाहीर प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदेंनी ‘ऑपरेशन टायगर’ फुलप्रूफ यशस्वी झाल्याची घोषणा केली. हा महाराष्ट्रातील मोठा राजकीय भूकंप मानला जातोय.
हे सर्व खासदार शिवसेना वाढवण्यासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी सोबत आले असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, असा शब्द त्यांनी दिला. संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, आणि भाऊसाहेब वाकचौरे या ६ खासदारांच्या या प्रवेशामुळे शिंदेंची शिवसेना आता अधिक भक्कम झाली असून, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचेही शिंदेंनी स्पष्ट केले.
TOP 10 News : खरीप पिकांच्या पेरण्यांना येणार वेग; पुढील 48 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
मान्सूनने अखेर वेग पकडला असून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये त्याने धडक दिलीय. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची वाटचाल अत्यंत वेगाने सुरू असून पुढील ४८ तासांत तो मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात सक्रिय होईल. या हवामान बदलामुळे गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मान्सूनच्या या आगमनामुळे राज्यातील बळीराजा सुखावला असून, खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग येणार आहे. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेय.
TOP 10 News : 5 जुलैपासून अण्णा हजारेंचे आमरण उपोषण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
‘महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम २०२६’ मधील जाचक दुरुस्त्या तातडीने रद्द न केल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ५ जुलैपासून राळेगणसिद्धी येथे आमरण उपोषणाचा थेट इशारा दिलाय. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलेय.
नवीन नियमांमधील ओळखपत्र सक्ती, माहितीचे कारण विचारणे, तर्कहीन शुल्कवाढ, ‘एक विषय – एक अर्ज’, वकिलांची मदत घेण्यास बंदी अशा नऊ प्रमुख तरतुदींवर अण्णांनी तीव्र आक्षेप घेतलाय. हे नियम भ्रष्टाचाराला ढाल देणारे असून यामुळे प्रशासनातील पारदर्शकता पूर्णपणे धोक्यात येईल. हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार वाचवण्यासाठी आपण प्राणाची आहुती देण्यासही मागे हटणार नाही, असे त्यांनी पत्रात ठणकावून सांगितलेय.
TOP 10 News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 20 टक्के वाढ; महिलांना 33% आरक्षण आणि 1 लाख नोकऱ्यांची घोषणा
पश्चिम बंगालमधील भाजप सरकारने आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प विधानसभेत सादर केलाय. अर्थमंत्री स्वपन दासगुप्ता यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २० टक्के वाढ करण्याची मोठी घोषणा केली. या बजेटमध्ये १ लाख रिक्त सरकारी पदे भरली जाणार असून, त्यात महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले जाईल.
महिलांना दरमहा ३,००० रुपये आर्थिक मदत आणि मोफत बस प्रवासाची सोय करण्यात आलीय. तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी ‘भरोसा’ योजना, राज्यात आयुष्मान भारतची अंमलबजावणी आणि उत्तर बंगालमध्ये आयआयटी व आयआयएम उभारणीसह अनेक महत्त्वपूर्ण घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्यात.
TOP 10 News : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा राजीनामा; अँडी बर्नहॅम पंतप्रधान बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लेबर पार्टीला मिळालेला मोठा पराभव आणि त्यानंतर पक्षातच वाढलेला तीव्र असंतोष यामुळे स्टारमर यांच्यावर राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव निर्माण झाला होता. त्यांच्याच मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांनी आणि खासदारांनी त्यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवला होता.
पक्षांतर्गत आव्हाने आणि वाढत्या राजकीय दबावामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. नवीन नेत्याची निवड होईपर्यंत स्टारमर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहतील. स्टार्मर यांच्या राजीनाम्यानंतर ग्रेटर मँचेस्टरचे महापौर अँडी बर्नहॅम हे लेबर पार्टीचे पुढील नेते आणि ब्रिटनचे पंतप्रधान बनण्याच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत.
TOP 10 News : अमेरिका-इराण अंतिम कराराचा रोडमॅप तयार; पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची मोठी घोषणा
अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये झालेली महत्त्वपूर्ण चर्चा यशस्वी झाल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलीय. या यशस्वी चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये अंतिम कराराचा रोडमॅप तयार झाला असून, पुढील ६० दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. ही बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून, अण्वस्त्र कार्यक्रम, आर्थिक निर्बंध आणि प्रादेशिक सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण प्रगती झालीय.
या वाटाघाटी यशस्वी करण्यासाठी कतार आणि पाकिस्तानच्या पथकाने, विशेषतः पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे शरीफ यांनी सांगितले. सध्या तांत्रिक पातळीवर चर्चा सुरू राहणार असून, देखरेखीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलीय. या घडामोडीकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागलेय.
TOP 10 News : जुना फोन विकण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की डिलीट करा; अन्यथा होईल मोठे नुकसान
नवीन फोन घेण्यासाठी अनेकदा जुना फोन विकला किंवा एक्सचेंज केला जातो. मात्र, घाईगडबडीत डेटा पूर्णपणे डिलीट न केल्यास गोपनीयता आणि बँकिंग सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
यासाठी फोन विकण्यापूर्वी फोटो, व्हिडिओ आणि महत्त्वाच्या फाइल्सचा बॅकअप घ्या. त्यानंतर गुगल पे, फोनपे सारख्या बँकिंग ॲप्ससह सोशल मीडिया आणि ईमेल खात्यांमधून लॉग आउट करून ती डिलीट करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, फोनमधून गुगल खाते किंवा ॲपल आयडी काढून टाका. शेवटी सिम व मेमरी कार्ड काढून फोन ‘फॅक्टरी रीसेट’ करायला विसरू नका.
TOP 10 News : दोन स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात लाँच; 26 जूनपासून विक्री सुरू
Ai+ कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपले ‘Nova 2 Neo 5G’ आणि ‘Nova 2 Pro 5G’ हे दोन नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केलेत. वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हे फोन उत्तम पर्याय ठरतील. Nova 2 Neo 5G मध्ये ६.७४ इंचाचा HD+ डिस्प्ले, मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० प्रोसेसर आणि १८W फास्ट चार्जिंगसह ६,०००mAh ची दमदार बॅटरी मिळते.
दुसरीकडे, Nova 2 Pro 5G मध्ये ६.९ इंचाचा FHD+ डिस्प्ले, डायमेंसिटी ७१०० प्रोसेसर आणि ३३W फास्ट चार्जिंग देण्यात आलीय. दोन्ही फोन्समध्ये ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि Android 16 आधारित NxtQuantum ओएस आहे. या सिरीजची सुरुवातीची किंमत १२,९९९ रुपये असून प्रो मॉडेलची किंमत १७,९९९ रुपयांपर्यंत जाते. बँकेच्या ऑफरअंतर्गत ग्राहकांना १,००० रुपयांची सूट मिळेल. २६ जूनपासून फ्लिपकार्टवर याची विक्री सुरू होईल.
TOP 10 News : सारा अली खानने साजरा केला पाकिस्तानी अभिनेत्रीचा वाढदिवस; व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि तिची आजी, दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी लंडनमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री कुब्रा खानचा वाढदिवस साजरा केला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
या खाजगी कौटुंबिक सोहळ्यात सारा आनंदाने वाढदिवसाचे गाणे गाताना दिसली, तर शर्मिला टागोर यांनी कुब्राला प्रेमाने केक भरवला. नुकतेच साराने आपली आई अमृता सिंग आणि आजीसोबतचे काही फोटोही शेअर केले होते. दरम्यान, सारा अली खान नुकतीच ‘पती पत्नी और वो २’ मध्ये दिसली होती आणि लवकरच ती आयुष्मान खुरानासोबत आगामी ‘उडता तीर’ या स्पाई-कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे.
TOP 10 News : वैभव सूर्यवंशीच्या भविष्याबाबत डेरील कलिननची चिंता; सचिनच्या दुखापतीचा दिला दाखला
१५ वर्षीय भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक ‘पॉवर हिटिंग’वर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू डेरील कलिनन याने चिंता व्यक्त केलीय. एवढ्या लहान वयात वेगाने आणि जड बॅटने शॉट मारताना मनगट, कोपर आणि सांध्यांवर मोठा ताण येऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
कलिननने २००४ मधील सचिन तेंडुलकरच्या ‘टेनिस एल्बो’ दुखापतीची आठवण करून दिली, ज्यामुळे सचिनचे करिअर धोक्यात आले होते. सध्याचे व्यस्त क्रिकेट वेळापत्रक पाहता, वैभवच्या वाढत्या वयात त्याच्या स्नायूंच्या आणि सांध्यांच्या दीर्घकालीन आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे कलिनन यांनी स्पष्ट केलेय.









