Todays Top 10 News: शिवजयंतीचा जल्लोष ते शेअर बाजारातील घसरण, राजकारण-क्रीडा-तंत्रज्ञानात मोठ्या घडामोडी
Todays Top 10 News: राज्यात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना मंत्रालयातील कथित लाचप्रकरणाने खळबळ उडवली आहे. बिहारमध्ये ४२ आमदारांना नोटीस, ब्रिटनमध्ये प्रिन्स अँड्र्यू यांना अटक, रस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्राची नवी योजना, ऑटो-टेक क्षेत्रातील नवे लाँच आणि शेअर बाजारातील मोठी घसरण अशा विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या घडामोडी वाचा.

Todays Top 10 News: शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा सोहळा, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होतेय. महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर पहाटेपासूनच शिवभक्तांनी मोठी गर्दी केली असून ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. किल्ले शिवनेरीवरील मुख्य शासकीय सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपस्थित राहून महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
या मंगलमयी प्रसंगी शिवजन्मस्थळी पारंपरिक पाळणा गाऊन महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त संपूर्ण गड फुलांनी सजवण्यात आला असून आकर्षक विद्युत रोषणाईने किल्ला उजळून निघालाय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिवभक्तांनी जन्मस्थळावर नतमस्तक होऊन शिवरायांना मानाची मानवंदना दिली.
मंत्रालयात लाच घेण्याचा ‘लाईन’ कोडवर्ड; फाईलवरच्या एका रेषेची किंमत 50 हजार
मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आलाय. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला ३५ हजारांची लाच घेताना पकडल्यानंतर, आता लाचेच्या ‘कोडवर्ड’चा खळबळजनक खुलासा झालाय. तक्रारदार निर्मल शर्मा यांच्या दाव्यानुसार, फाईलवर मारलेल्या रेषांवरून लाचेची रक्कम ठरवली जात असे. फाईलवर एक लाईन ओढली असल्यास ५० हजार आणि दोन लाईन असल्यास १ लाख रुपये द्यावे लागत होते.
मंत्री कार्यालयात नसताना त्यांचे खासगी सचिव रामदास गाडे हेच सुनावण्या घेत असून, त्यांच्या सूचनेनुसारच हा वसुलीचा बाजार चालत असल्याचा आरोप शर्मा यांनी केलाय. शर्मा यांच्याकडून सुरुवातीला १ लाख १० हजारांची मागणी करण्यात आली होती, मात्र तडजोडीनंतर ५० टक्के ‘डिस्काउंट’ देऊन ५५ हजारांत व्यवहार ठरला. मंत्रालयात येणाऱ्या ९० टक्के लोकांकडून अशाच प्रकारे पैसे उकळले जात असल्याचे या प्रकरणातून उघड झाले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय.
बिहारमध्ये 42 आमदारांना खुर्ची धोक्यात? निवडणूक गैरप्रकार प्रकरणी हायकोर्टाची नोटीस
बिहारच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून पाटणा उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष प्रेम कुमार यांच्यासह तब्बल ४२ विद्यमान आमदारांना एकाच वेळी नोटीस बजावलीय. निवडणुकीदरम्यान प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आणि तथ्ये लपवल्याचा गंभीर आरोप या नेत्यांवर आहे.
नोटीस मिळालेल्यांमध्ये राज्याचे ऊर्जा मंत्री विजेंद्र यादव, माजी मंत्री जीवेश मिश्रा, आमदार चेतन आनंद आणि राजदचे अमरेंद्र प्रसाद यांसारख्या दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. पराभूत उमेदवारांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने हे पाऊल उचललेय. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंचे आमदार या कायदेशीर कचाट्यात सापडलेत. जर हे आरोप सिद्ध झाले, तर संबंधित लोकप्रतिनिधींचे विधानसभा सदस्यत्व रद्द होऊ शकते, ज्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
प्रिन्स अँड्र्यू यांना अटक; लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप
ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स अँड्र्यू यांना गुरुवारी सकाळी सँडरिंगहॅम येथील निवासस्थानातून अटक करण्यात आली. सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरून पोलिसांनी ही कारवाई केलीय. विशेष म्हणजे अँड्र्यू यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही कारवाई झाली. जेफ्री एपस्टीन प्रकरणात नाव आल्यानंतर पीडित व्हर्जिनिया गिफ्रे यांनी अँड्र्यू यांच्यावर २००१ मध्ये १७ वर्षांच्या असताना बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
यापूर्वीच किंग चार्ल्स यांनी कठोर पाऊल उचलत अँड्र्यू यांच्याकडून ‘प्रिन्स’ किताब, लष्करी पदव्या आणि सर्व शाही सन्मान काढून घेतलेत. त्यांना ३० खोल्यांचे ‘रॉयल लॉज’ हे निवासस्थान रिकामे करून एका खासगी घरात राहण्याचे आदेश देण्यात आलेत. आता त्यांना ‘अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर’ या नावाने ओळखले जाईल. शाही इतिहासात १०६ वर्षांनंतर अशा प्रकारे पदवी काढून घेण्याची ही पहिलीच मोठी घटना ठरलीय.
रस्ते अपघातातील जखमींना आता दीड लाखांपर्यंत मोफत उपचार; सरकारची नवी पीएम राहत योजना
रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी केंद्र सरकारने पीएम राहत ही नवी योजना सुरू केलीय. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अपघातग्रस्ताला आता पैशांअभावी उपचारांपासून वंचित राहावे लागणार नाही. अपघातानंतरच्या पहिल्या तासात, ज्याला ‘गोल्डन आवर’ म्हणतात, तातडीने उपचार मिळावेत यासाठी सरकार दीड लाख रुपयांपर्यंतचा सर्व खर्च उचलणार आहे. ही सुविधा कॅशलेस असून रुग्णालयात ७ दिवसांपर्यंत मोफत उपचार मिळतील.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघात झाल्यावर त्वरित ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करावा लागेल. त्यानंतर जखमीला जवळच्या रुग्णालयात नेले जाईल. विशेष म्हणजे, अपघात शहर, हायवे किंवा ग्रामीण भागात कुठेही झाला तरी या योजनेचा लाभ घेता येईल. ही सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने चालणार असून उपचारांचा खर्च सरकार थेट रुग्णालयाला देईल. जर एखाद्या अपघातात वाहनचालकाचा विमा नसेल किंवा ‘हिट अँड रन’ची केस असेल, तरीही सरकार या योजनेतून मदत करणार आहे. यामुळे रस्ते अपघातात होणारे मृत्यू रोखण्यास मोठी मदत होणार आहे.
सविस्तर वृत्त – PM RAHAT Scheme: रस्ते अपघातातील जखमींना दीड लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार
फोक्सवॅगनची ‘टायरॉन आर-लाईन’ भारतात लाँच; फॉर्च्युनरला मिळणार तगडी टक्कर
फोक्सवॅगन इंडियाने प्रीमियम थ्री-रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये पाऊल टाकत आपली फ्लॅगशिप ‘टायरॉन आर-लाईन’ भारतीय बाजारात ४६ लाख ९९ हजार रुपये एक्स-शोरूम किमतीत लाँच केलीय. ५१,००० रुपयांच्या टोकन रकमेवर या कारची बुकिंग सुरू झाली असून ही कार टोयोटा फॉर्च्युनरसारख्या प्रस्थापित गाड्यांना आव्हान देणार आहे.
२.० लिटर टीएसआय पेट्रोल इंजिन असलेली ही एसयूव्ही अवघ्या ७ सेकंदात १०० किमीचा वेग गाठू शकते. यात १५ इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टिम, पॅनोरमिक सनरुफ, ९ एअरबॅग्स आणि लेव्हल २ एडीएएस सारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आलीत. आरामदायी प्रवासासाठी यात मसाज फंक्शन असलेल्या जागा आणि ७००-वॉटची हरमन कार्डन ऑडिओ सिस्टिम उपलब्ध आहे.
सॅमसंगची ‘गॅलेक्सी S26’ सिरीज होणार लाँच; प्री-बुकिंगला सुरुवात
सॅमसंग आपली बहुचर्चित ‘गॅलेक्सी S26’ सिरीज या महिन्याच्या अखेरीस जागतिक स्तरावर लाँच करण्यासाठी सज्ज झाली असून भारतात याची प्री-बुकिंग प्रक्रियाही सुरू झालीय. या सिरीजमध्ये गॅलेक्सी S26, S26 प्लस आणि S26 अल्ट्रा हे तीन स्मार्टफोन नवीन गॅलेक्सी बड्ससह सादर केले जातील.
अल्ट्रा मॉडेलमध्ये ६.९ इंचाचा डिस्प्ले, २०० एमपी कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन ८ एलाईट जेन ५ प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. या सिरीजची सुरुवातीची किंमत ८२,९९९ रुपयांपासून सुरू होऊन अल्ट्रा मॉडेलसाठी १,३४,९९९ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ९९९ रुपयांत प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना मोफत स्टोरेज अपग्रेडचा लाभ मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केलेय.
शेअर बाजारात ‘ब्लॅक थर्सडे’; सेन्सेक्स 1236 अंकांनी कोसळला
भारतीय शेअर बाजारात आज १९ फेब्रुवारी रोजी भीषण पडझड पाहायला मिळाली. सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर नफेखोरी आणि अमेरिका-इराणमधील वाढत्या तणावामुळे बाजारात घसरण झाली. दिवसाअखेर बीएसई सेन्सेक्स १२३६ अंकांच्या घसरणीसह ८२,४९८ वर बंद झाला, तर निफ्टी ३६५ अंकांनी घसरून २५,४५४ च्या पातळीवर स्थिरावला.
या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात सुमारे ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजारातील सर्वच क्षेत्रांत विक्रीचा दबाव दिसून आला, ज्यामध्ये रिअल्टी, ऑटो आणि बँकिंग शेअर्सना मोठा फटका बसला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पवित्रा घेत नफा वसुली केली. सेन्सेक्समधील सर्व ३० शेअर्स तोट्यात बंद झाले असून, इंडिगो आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक घसरले. तज्ज्ञांच्या मते, निफ्टी जोपर्यंत २५,१५० च्या वर आहे तोपर्यंत आशा कायम आहे, अन्यथा बाजारात अधिक घसरण होऊ शकते.
‘राजा शिवाजी’चे दमदार पोस्टर रिलीज; रितेश देशमुख साकारणार छत्रपती शिवरायांची भूमिका
छत्रपति शिवाजी महाराज जयंतीच्या शुभमुहूर्तावर अभिनेता रितेश देशमुखच्या महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आलाय. जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने या भव्य ऐतिहासिक चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवलीय. या द्विभाषिक (मराठी-हिंदी) चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख करत असून, यात तो छत्रपती शिवरायांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये महाराजांचा तेजस्वी चेहरा आणि हाती धरलेली तलवार त्यांच्या जिद्दीची साक्ष देत आहे. अजय-अतुल यांचे संगीत आणि संतोष सिवन यांचे छायांकन असलेला हा चित्रपट स्वराज्य स्थापनेची प्रेरणादायी गाथा जागतिक स्तरावर मांडणार आहे. ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांची निर्मिती असलेला हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असून, शिवरायांचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर जिवंत होणार आहे.
हरमनप्रीत कौरचा विश्वविक्रम; महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात मैदानात उतरताच नवा इतिहास रचलाय. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३५६ सामने खेळण्याचा विश्वविक्रम आता हरमनप्रीतच्या नावावर झालाय.
तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सचा ३५५ सामन्या विक्रम मोडीत काढला. कॅनबेरा येथील या ऐतिहासिक सामन्यासह हरमनप्रीतने आपल्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत १८९ टी-२०, १६१ वनडे आणि ६ कसोटी सामने खेळलेत. या विक्रमासह ती जगातील सर्वाधिक अनुभवी महिला खेळाडू ठरली असून, भारताला मालिका जिंकून देण्यासाठी सज्ज झालीय.
सविस्तर वृत्त – हरमनप्रीत कौरचा वर्ल्ड रेकॉर्ड! सुझी बेट्सला मागे टाकत रचला नवा इतिहास











