TMKOC: ७ वर्ष कामाविना भटकले ‘अब्दुल’, पण ‘तारक मेहता…’ने दिला नवा जन्म : शरद सांकला यांचा संघर्ष

TMKOC: लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील गोकुळधाम सोसायटीचा अब्दुल म्हणजेच शरद सांकला हे प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. त्यांच्या हलक्या-फुलक्या अभिनयामुळे ते घराघरात ओळखले जातात. पण आज जे कलाकार प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणतात, त्यांच्याच आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा त्यांना सात वर्षे कामच मिळाले नाही.
शरद सांकला यांनी अलीकडे दिलेल्या मुलाखतीत आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून दिली. ते म्हणाले, “कामासाठी प्रत्येक ऑफिसची धावपळ केली. पण कुठूनही काही फायदा झाला नाही. सात वर्षांचा काळ पूर्णपणे वाया गेला.”
या कठीण काळानंतर त्यांच्या आयुष्यात वळण आलं, जेव्हा त्यांची भेट ‘तारक मेहता…’चे निर्माता असित कुमार मोदी यांच्याशी झाली. असित मोदी यांनी त्यांना अब्दुलची भूमिका दिली आणि त्यानंतर त्यांचे नशीबच पालटले.
अफवा आणि शरद यांची स्पष्टता
अलीकडेच अशी चर्चा होती की शरद सांकला शो कायमचा सोडून जाणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र शरद यांनीच स्पष्ट केलं की या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. “मी कुठेही जाणार नाही. शोच्या कथेत माझ्या व्यक्तिरेखेला काही काळासाठी जागा नव्हती, पण लवकरच परत येणार आहे. हा शो माझ्यासाठी खूप खास आहे आणि ‘अब्दुल’ या व्यक्तिरेखेमुळे मला खरी ओळख मिळाली आहे.”
‘शो माझं कुटुंब आहे’
शरद पुढे म्हणाले, “नीला टेलिफिल्म्स प्रोडक्शन हाऊस हे माझ्यासाठी कुटुंबासारखं आहे. असित मोदी माझे कॉलेजमित्र आहेत. त्यामुळे मी हा शो कधीच सोडणार नाही. जोपर्यंत शो सुरू आहे, तोपर्यंत मी त्याचा भाग राहणार.”
आज ६० वर्षांचे शरद सांकला प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असले तरी, त्यांच्या या यशामागे संघर्षाची मोठी कहाणी दडली आहे. ‘तारक मेहता…’ने त्यांना नवा जन्म दिला, असं ते स्वतः मान्य करतात.





