Pimpri News : मुलाच्या लग्नापूर्वीच आईवर काळाचा घाला; सुवासिनींचे जेवण राहिले अर्धवटच

पिंपरी : अवघे तीन दिवसांवर मुलाचे लग्न. घरात लगीनघाई, पाहुण्यांची ये-जा, खरेदीची लगबग सुरू होती. पण आनंदात न्हाऊन निघालेल्या घरावर काळाने असा घाला घातला की सर्व काही क्षणात संपले. चिंचवड येथील मोहननगर परिसरात शुक्रवारी सकाळी पाण्याच्या टाकीत बुडून एका आईचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
आशा संजय गवळी (वय ५२, रा. मोहननगर, चिंचवड) असे मृत्यूमुखी पडलेलया महिलेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. आशा या गृहिणी तर त्यांचे पती पुण्यातील शाळेत कर्मचारी आहेत. दोन्ही मुलांना इंजिनियर बनविण्यासाठी गवळी दाम्पत्याने आयुष्यभर कष्ट घेतले. मोठ्या मुलाचे लग्न झाले असून त्याला एक मुलगाही आहे.
मूळ इंदापूर तालुक्यातील असलेल्या गवळी कुटुंबातील छोट्या मुलाचे लग्न येत्या ४ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे होणार होते. ३ नोव्हेंबर रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम होणार होता. घरात लग्नाचे धार्मिक विधी सुरू होते. सगळी मंडळी तयारीत गुंतलेली. लग्नासाठी कपडे, दागिने, मानपानाचे साहित्य सर्व काही तयार होते.
स्वयंपाकाची तयारी अन् पाण्याची टंचाई
दरम्यान, शुक्रवारी देवीचा वार असल्याने घरात ‘सुवासिनींचे जेवण’ ठेवण्यात आले होते. स्वयंपाकाची तयारी सुरू असतानाच पाण्याची टंचाई जाणवली. त्यामुळे आशा या सोसायटीच्या पार्किंगमधील जमिनीखालच्या टाकीतून पाणी काढण्यासाठी गेल्या. त्यांनी झाकण उघडून बादली टाकली, मात्र पाणी खोल असल्याने बादलीत पाणी घेताना त्यांचा तोल गेला आणि त्या टाकीत पडल्या.
सुमारे वीस मिनिटांनी त्यांचा मुलगा आई दिसत नसल्याने शोध घेऊ लागला. टाकीचे झाकण उघडे दिसल्याने त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने आत पाहिले असता आई पाण्यात बुडालेली दिसली. हे दृश्य पाहून तो अक्षरशः हंबरडा फोडत खाली उतरला. शेजाऱ्यांनीही धाव घेऊन आशा यांना बाहेर काढले. त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याचे सांगत वायसीएम रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, तेथे पोहोचताच डॉक्टरांनी आशा यांना मृत घोषित केले.
अन् सर्वांचे डोळे पाणावले
या घटनेने मोहननगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लग्नाच्या तयारीचा गजबजलेला माहोल एका क्षणात शोकाकुल झाला. लग्नघरातली प्रकाशझोत मंदावली, हसरे चेहरे ओले झाले आणि “आशा ताई गेल्या” हे शब्द ऐकून सर्वांचे डोळे पाणावले. ज्या आईने आयुष्यभर संसार उभा केला, मुलांना घडवले, त्यांच्या लग्नाचे स्वप्न रंगवले… तीच आई तीन दिवस आधीच काळाच्या पडद्याआड गेली. परिसरातील नागरिक एकच प्रश्न विचारत आहेत, “मुलाचे हात पिवळे करण्याआधीच आईने शेवटचा निरोप का घेतला?”





