PCMC Recruitment: महापालिकेच्या नोकरभरतीला लागेना मुहूर्त! ४,७१९ पदे रिक्त; अतिरिक्त ताणामुळे प्रशासनाचा कारभार संथ
PCMC Recruitment: ३० लाख लोकसंख्येच्या शहराला नागरी सुविधा पुरवताना दमछाक; नव्या आकृतीबंधानुसार ११,५६१ पैकी ६,८४२ पदांवरच प्रत्यक्ष कर्मचारी कार्यरत.

PCMC Recruitment – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील तब्बल ४ हजार ७१९ पदे रिक्त असल्याने पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. मागील चार ते पाच वर्षांत मोठ्या संख्येने अनुभवी अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु, त्या तुलनेत नवीन भरती न झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. परिणामी, उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून, महापालिकेचा कारभार संथ झाला आहे.
शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना, नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा पुरवणे हे महापालिकेसमोरील मुख्य आव्हान आहे. मात्र, प्रशासकीय विभागात कर्मचाऱ्यांची टंचाई जाणवत आहे. आरोग्य, पाणीपुरवठा, कर संकलन, आणि नगररचना यांसारख्या थेट जनतेशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या विभागांमध्येही शेकडो पदे रिक्त आहेत. एकाच अधिकाऱ्याकडे दोन ते तीन विभागांचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आल्याने फाईल्सचे वेळेत निकाल लागणे कठीण झाले आहे.
यामुळे कामाचा खोळंबा होत असून सर्वसामान्यांना विविध कामांसाठी पालिकेच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण येत आहे. वाढत्या कामाच्या बोजामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत असून प्रशासनाची गती मंदावली आहे. सेवानिवृत्त झालेल्या अनुभवी मनुष्यबळाची जागा भरण्यासाठी नवीन आणि तंत्रस्नेही तरुणांची भरती करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले अनेक अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त झाले आहेत. काही अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे शहराची सखोल माहिती असलेल्या अनुभवी अधिकाऱ्यांची कमतरता जाणवत असून भविष्यात विकासकामांच्या अंमलबजावणीवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नवीन आकृतीबंध मंजुरीच्या प्रतिक्षेत
तीस लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात नागरी सुविधा पुरविताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यातही अडथळे निर्माण होत आहेत. महापालिका ‘ब’ वर्गात समाविष्ट झाल्यानंतर नवीन आकृतिबंध तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून तो प्रलंबित आहे. नव्या आकृतिबंधानुसार महापालिकेत एकूण ११ हजार ५६१ पदे मंजूर असून त्यापैकी केवळ ६ हजार ८४२ पदांवर अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वाढते अवलंबित्व; ठेकेदारी संस्थांचे चांगभले
रिक्त पदे न भरल्याने महापालिका विविध सेवांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. सफाई कर्मचारी, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, व्हॉल्वमन, सुरक्षारक्षक, मदतनीस आणि वॉर्डन यांसारख्या पदांसाठी ठेकेदारी संस्थांवर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने कंत्राटी पद्धतीने काही पदे भरून काम चालवण्याचा प्रयत्न केला असला, तरी तो तात्पुरता ठरत आहे. जोपर्यंत शासन स्तरावरून किंवा महापालिका पातळीवर या ४ हजार ७१९ रिक्त पदांची कायमस्वरूपी मेगाभरती केली जात नाही, तोपर्यंत प्रशासनाचा हा ताण कमी होणे अशक्य आहे.




