पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक – नोव्हेंबरमध्ये होणार आरक्षण सोडत

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेतील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) तसेच, खुल्या गटातील या सर्व राखीव जागांवर महिलांसाठी असलेल्या जागेसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि. २७) जाहीर केला.
त्यानुसार ९, १० किंवा ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत महापालिका घेऊ शकते. त्याबाबतचे नियोजन करण्याचे आदेश महापालिकेच्या निवडणूक विभागाला देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या ४ सदस्यीय ३२ प्रभागांची रचना अंतिम झाली आहे. त्यात एकूण १२८ जागा आहेत. ही प्रभागरचना अंतिम करताना सहा प्रभागांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे लोकसंख्येसह एससी व एसटी लोकसंख्येची आकडेवारी बदलल्याने त्या वर्गाच्या आरक्षणात बदल झाले आहेत.
प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर प्रभागातील आरक्षण कसे असणार यावर इच्छुक व माजी नगरसेवकांना निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी सर्वांचे डोळे आरक्षण सोडतीकडे लागले होते. अखेर निवडणूक आयोगाने आरक्षण सोडत घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
सोडतीची जाहीर सूचना ८ नोव्हेंबरला वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. तर आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी ११ नोव्हेंबरला पाठवयाचा आहे. म्हणजेच ९, १० व ११ या तीन दिवसांमध्ये सोडत घ्यावी लागणार आहे.
एससीच्या २०, एसटीच्या ३ जागेनंतर ओबीसीसाठी ३५ जागांवर तसेच, खुल्या गटातील ३५ जागांवर महिलांचे आरक्षण पडणार आहे. प्रभागातील अ, ब, क आणि ड या जागा कोणाला सुटणार, एकूण १२८ पैकी महिलांसाठी कोणत्या प्रभागातील जागा सुटणार, याबाबत इच्छुकांसह माजी नगरसेवक व पदाधिकार्यांचे लक्ष लागले आहे. राखीव जागेवरील खुल्या गटात पुरूषांना लढता येते मात्र, खुल्या गटातील जागेवर पुरुषांसोबत महिलांनाही लढता येते. त्यामुळे सर्व ३२ प्रभागाचे चित्र सोडतीनंतर अधिक स्पष्ट होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विहित मुदतीत सोडत घेण्यात येईल. आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या जातात. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांकडून पारदर्शक ड्रॅममधून चिठ्ठी काढली जाते. त्यानुसार त्या प्रभागात महिला व पुरूष असे आरक्षण निश्चित केले जाते. यंदा आरक्षण सोडतीवर हरकती व सुचना स्वीकारण्यात येणार आहेत. – सचिन पवार, उप आयुक्त, निवडणूक विभाग, पिं.चिं. महापालिका.





