Tikona Fort: श्रावणधारा अन् रानफुलांचा बहर! तिकोना गडाचे स्वर्गीय रूप पाहून तुम्हीही मोहात पडाल
Tikona Fort: मुळशी-मावळ सीमेवरील ऐतिहासिक तिकोना गड हिरवाईने नटला; रानफुले अन् धुक्याच्या लपंडावाने पर्यटकांना घातली भुरळ.

Tikona Fort – मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मुळशी-मावळच्या सीमेवर असलेला ऐतिहासिक तिकोना गड हिरवाईने नटला आहे. श्रावणधारांनी तृप्त झालेला गडाचा परिसर विविध प्रकारच्या रानफुलांनी बहरला असून, हिरवळीची चादर आणि फुलांची रंगत यामुळे तिकोना गडाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. श्रावणातील बरसणार्या पावसात भिजत निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी विविध भागांतून गडप्रेमी आणि हौशी पर्यटक मोठ्या संख्येने तिकोना गडावर हजेरी लावत आहेत.
तिकोना गडावरून उत्तर दिशेला मावळ तालुक्याचा, तर दक्षिण दिशेला मुळशी तालुक्याचा विस्तीर्ण परिसर नजरेत भरतो. पश्चिमेकडे पवना धरणाचा लांबवर पसरलेला विस्तीर्ण जलसाठा आणि काशिग गावाजवळील तलाव यामुळे गडाच्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. पावसाळ्यात ढगांच्या सावलीत आणि धुक्याच्या लपंडावात दिसणारे हे विहंगम दृश्य पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे.
त्रिकोणी आकाराच्या तिकोना गडाच्या एका बाजूच्या उंच, खड्या कड्यावर हिरव्यागार गवताचा गालिचा पसरला आहे, तर दुसर्या बाजूला गर्द हिरवी दाट वृक्षराजी लक्ष वेधून घेत आहे. परिसरात विविध ठिकाणी उमललेली रानफुले, दगडफुले, रानकेळीची डेरेदार बेटे आणि विविध वनौषधी यामुळे येथील जैवविविधता अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळत आहे. रानफुलांसोबतच परिसरात आढळणार्या विविध रानभाज्या आणि रानफळांमुळेही पावसाळ्यातील तिकोना परिसराचे वेगळेपण अधोरेखित होते.
निसर्गाच्या या मुक्त उधळणीमुळे गड परिसरात फिरताना प्रत्येक वळणावर वेगवेगळे निसर्गचित्र अनुभवायला मिळत आहे. गडाच्या पायथ्यापर्यंत झालेला पक्का रस्ता हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. निसर्गरम्य परिसर, ऐतिहासिक वास्तू, गडसंवर्धनाचे प्रयत्न आणि वाहतुकीची झालेली सोय यामुळे तिकोना गड सध्या पर्यटकांसाठी मोठी पर्वणी ठरत आहे.
संवर्धनामुळे पर्यटकांची संख्या वाढली
तिकोना गडाला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसंपदा यामुळे गडप्रेमींचे आकर्षण पूर्वीपासूनच आहे. मात्र, गडावर श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुरातत्त्व विभाग तसेच अन्य संस्थांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या गडसंवर्धनाच्या कामामुळे आणि पर्यटकांच्या सोयी-सुविधा व सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे तिकोना गडाकडे येणार्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.






