Mulshi News: मुळशीचे अस्तित्वच संपणार? स्वतंत्र नगरपालिका मागणीसाठी काँग्रेस आक्रमक…पाहा काय घडतंय?
Mulshi News: हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे व जांबेचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्यास मुळशी तालुका काँग्रेसचा तीव्र विरोध.

Mulshi News – हिंजवडीसह मुळशी तालुक्यातील माण, मारुंजी, नेरे ,जांबे आणि परिसरातील गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याच्या राज्य सरकारच्या हालचालींना मुळशी तालुका काँग्रेस कमिटीने तीव्र विरोध केला आहे. या गावांचा महापालिकेत समावेश करण्याऐवजी हिंजवडी-माण-मारुंजी परिसरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी,
अशी मागणी मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश पारखी व कार्याध्यक्ष सचिन किर्वे यांनी केली आहे. महानगरपालिकेच्या विस्तारामुळे भविष्यात मुळशी तालुक्याचे भौगोलिक तसेच राजकीय अस्तित्वच धोक्यात येऊ शकते, त्यामुळे या गावांचे व जागतिक दर्जाच्या आयटीपार्कचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी या भागाकरिता स्वतंत्र नगरपालिका निर्माण करावी.
या गावांचा महापालिकेत समावेश करण्याच्या हालचाली गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहेत. मात्र, मुळशी तालुका काँग्रेस कमिटीने यापूर्वीच स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी करत हिंजवडी शिवाजी चौकात आंदोलन केले होते. हिंजवडी-माण-मारुंजी परिसराचा राजीव गांधी इन्फोटेक पार्कमुळे झपाट्याने विकास झाला असून, या भागाच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन आवश्यक असल्याचे पारखी यांनी म्हटले आहे.
महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, ड्रेनेज, वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न पूर्णपणे सुटतीलच, याची शाश्वती नाही. यापूर्वी महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागातील अनेक गावांची स्थिती त्याचे उदाहरण असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
“याबाबत आम्ही गेल्या वर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. परंतु अजितदादांच्या निधनानंतर आता मुख्यमंत्र्यांनी आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पिंपरी चिंचवड मध्ये समावेश करण्याचे सूचित केल्याने त्यास आमचा विरोध आहे, सरकारनें जनभावना लक्षात घेऊन विचार करावा अन्यथा आम्ही जनआंदोलन उभारू”
– सुरेश पारखी, अध्यक्ष, मुळशी तालुका काँग्रेस





