पुणे जिल्हा | कडूसवासीयांचा पाणीप्रश्न मार्गी

कडूस, (वार्ताहर) – खेड तालुक्यातील कडूस येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासाठी होत असल्याच्या तीव्र तुटवड्यामुळे तसेच ऐन उन्हाळ्यात दुष्काळ सदृश परिस्थितीला दरवर्षी सामोरे जाण्याने ग्रामस्थ वैतागले होते.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या वर्षी विशेष प्रयत्नांची पराकाष्ठा करून चार कि.मी अंतरावरील टोकेवाडी येथील विहीरीतील पाणी पाइपलाइन दुरूस्तीचे काम आणि मोटार रिपेरिंगचे काम पूर्ण करून रविवारी (दि. 26) कडूस येथील पुरवठा करणार्या विहिरीत पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
अशक्य काम करण्याची इच्छा पूर्ण झाल्याने, रविवारी कडूस ग्रामपंचायतीच्या बिनविरोध नूतन उपसरपंच रंजना पानमंद यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच निवृत्ती नेहरे, उपसरपंच अनिकेत धायबर, सदस्य गणेश मंडलिक, अरुण शिंदे, सुधा पानमंद, बा. ज. गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य अभिजित शेंडे, अध्यक्ष मारुती जाधव, आनंदराव पानमंद, युवराज बंदावणे, उद्योजक भुषण ढोबळे, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कडूसच्या पाटबंधार्याच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीत भीमा नदीतून आणलेले पाणी, बंदावणे शिवारातील मोठ्या टाकीतून संपूर्ण गावात नियमितपणे सोडण्यात येणार असल्याचे उपसरपंच रंजना पानमंद यांनी सांगितले.
लवकरच पानमंदवाडी, मुसळेवाडी, शेंडेवाडी,तुरुकवाडी तसेच गावातील नादुरुस्त पाइपलाइनचे दुरूस्तीचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून युद्ध पातळीवर सुरू होणार आहे. – शहनाज तुरूक, सरपंच, कडूस ग्रामपंचायत





