पुणे जिल्हा | कडूस येथे 126 महिलांची ऑफलाइन नोंदणी

कडूस, (वार्ताहर)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कडूस येथे आयोजित मोफत शिबिराला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या योजनेच्या काही जाचक अटी सरकारने शिथिल केल्यानंतर लाभार्थी महिलांची दिवसभर गर्दी दिसून आली. आयोजित शिबीराला दिवसभरात 126 महिलांनी ऑफलाइन अर्ज नोंदणी करून सहभाग नोंदविला.
येथे बॉश इंडीया फाऊंडेशन व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कडूसच्या बंदावणे शिवारातील युवराज बंदावणे यांनी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी बॉश इंडिया कंपनीचे सहकारी रोहित बलुरे, वर्षा अडागळे, यांचे योगदान लाभले.
आयोजक युवराज बंदावणे यांनी बंदावणे शिवार व परिसरातील कोणतीही महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी नोंदणी मुदतीपर्यंत प्रयत्नशील असल्याचे सांगून पुणे जिल्हा सहकारी बँकेत खाते उघडण्याची विशेष सोय केली असल्याचे सांगितले.
बंदावणे शिवार येथील साईग्रुपला माजी उपसरपंच अनिकेत धायबर, अक्षय खळदकर, प्रमोद शिंदे, नवनाथ काळोखे,आनंद पांनमंद, वैभव ढमाले, अजय शैळके, तुषार मोढवे, स्वप्निल खंडागळे, रवींद्र गायकवाड, अजित ढमाले, निलेश ढमाले, ज्ञानेश्वर बंदावणे, स्वप्निल मुसळे आणि बंदावणे युवकांनी सहकार्य केले.





