Khed Agriculture News: कडूसमध्ये हरभऱ्याचे रान बहरले; कृषी विभागाच्या बियाणांनी आणली समृद्धी

प्रभात वृत्तसेवा
कडूस – कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेंतर्गत कडूस गावातील प्रगत कृषी उद्योग शेतकरी गटास हरभरा बियाणांचे वाटप करण्यात आले होते. अनुकूल हवामानामुळे कडूस व परिसरातील हरभरा पिकाची सध्या जोमदार वाढ झाल्याचे दिसून येत आहे.या नव्या उपक्रमाची दखल घेत तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी गटातील शेतकर्यांच्या शेतावर भेट देत प्रत्यक्ष हरभरा पिकाची पाहणी केली.
नियोजनबद्ध पद्धतीने व मेहनतीने वाढविण्यात आलेल्या हरभरा पिकाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत शेतकरी गटाचे कौतुक केले. यावेळी कीटकनाशकांची फवारणी कधी व किती वेळा करावी, किडीचे प्रभावी नियंत्रण कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
संदीप धायबर, नामदेव नेहेरे, सोपान हुरसाळे, दिलीप ढमाले, संतोष गारगोटे आदी शेतकर्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या. प्रगत कृषी उद्योग गटाचे अध्यक्ष दिलीप ढमाले व सचिव संतोष गारगोटे यांनी गटामार्फत राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
आगामी काळात गूळ प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी आवश्यक प्रयत्न व त्यासंबंधीचा अभ्यास सुरू असल्याची माहिती अध्यक्ष दिलीप ढमाले यांनी दिली.यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी ज्योती राक्षे यांनी कृषी विभागाच्या वतीने शेतकरी हितासाठी राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती देत शेतकर्यांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.





