पुणे जिल्हा | कडूसच्या पश्चिमेकडील एसटी सेवा सुरू

कडूस, (वार्ताहर)- येथील मशीद ते साबुर्डी रोड चौक यामधील दोनशे मीटर रस्त्याचे कॉक्रिटीकरणाचे काम गेली दोन महिने चालू असलेल्या कामामुळे कडूसच्या पश्चिमेकडील एसटी सेवा ठप्प झाली होती.
गारगोटवाडीचे ग्रामपंचायत सदस्य दत्ता कंद यांनी संथगतीने आणि मनमानी पद्धतीने चाललेल्या कामाबद्दल ठेकेदाराकडे आक्षेप नोंदवून ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक व्यवस्था होईल अशी व्यवस्था ठेकेदाराकडून सत्वर झाल्याने, पश्चिम भागातील गावाकडे महामंडळाकडून एसटी सेवा सुरू झाली.
पश्चिम भागातील वाशेरे, रौंधळवाडी, कोहिंडे बुद्रुक, शेंडेवाडी, गारगोटवाडी, पानमंदवाडी या गावांची सेवा पूर्णपणे बंद होती. दरम्यानच्या काळात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, चाकण, खेड येथील औद्योगिक क्षेत्रातील कामगार, दूध व्यावसायिक शेतकर्यांना भरपूर त्रास झाला. याकरिता गारगोटवाडी ग्रामपंचायत आणि मानवी अधिकार संस्थेचे जिल्हा अधिकारी दत्ता कंद यांनी दिरंगाई होत असलेल्या कामाबाबत आवाज उठवला होता.
पश्चिम भागातील एसटी महामंडळाने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची, कामगार आणि व्यावसायिक शेतकर्यांच्या गैरसोयीची लागलीच दखल घेऊन एसटी सेवा सुरू केली.
दोन महिन्यांच्या कालावधीनंतर पहिल्या फेरीसाठी आलेल्या एसटी वाहन- चालकाचा सरपंच वर्षा बच्चे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता कंद, ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर बच्चे यांनी ग्रामस्थांच्या वतीने समाधानपूर्वक सत्कार केला. यावेळी भीमाजी गारगोटे, बाळासाहेब शिंदे, पार्वती बच्चे, सीताराम बच्चे, संतोष बच्चे, चंद्रशेखर बच्चे, गुरूदेव गारगोटे उपस्थित होते.





