अमरसिंह भातलवंडे
पिंपरी – विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी जिल्हा निवडणूक विभागाने नुकतीच प्रसिद्ध केली. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीनच महिन्यात शहरातील तीन विधानसभा मतदार संघांमध्ये तब्बल 36 हजार नवमतदारांची नावे वाढली आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर स्थलांतरित, दुबार आणि मृत मतदार वगळण्यात आले आहेत. आता पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या 3 मतदारसंघांत 13 लाख 618 मतदार असून हेच मतदार आता शहरातील तीन आमदारांची निवड करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीचा ज्वर उतरल्यानंतर काही दिवसात विधानसभा निवडणुकीचे वेध राजकीय पक्षांना लागले आहेत. पुढच्या आठवड्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असल्याने विधानसभा निवडणुकीचे सर्वच इच्छुक झाडून तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने मतदार यादी प्रसिध्द केली आहे. ही यादी प्रसिध्द झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवार मतदारांच्या गाठी-भेटीसोबतच कुठल्या भागातील मतदान वाढले किंवा कमी झाले आहे याचे गणित मांडताना दिसत आहेत.
भोसरीमध्ये सर्वाधिक वाढ तरी चिंचवडच मोठा
पिंपरी-चिंचवड शहरात विधानसभेचे तीन मतदार संघ आहेत. यामध्ये सर्वाधिक मतदार हे चिंचवड विधानसभा मतदारसंघात होते. तर सर्वात कमी मतदार पिंपरी मतदारसंघात होते. लोकसभा निवडणुकीनंतरही हेच चित्र सध्या तरी कायम राहिले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या मतदार नोंदणीमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 18 हजार 835 मतदार वाढले आहेत. यामध्ये 10 हजार 73 पुरुष तर 8 हजार 754 स्त्री व इतर 8 अशी नवमतदारांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ चिंचवड विधानसभा मतदारसंघात 7 हजार 454 पुरुष, 6 हजार 641 स्त्री व इतर 1 असे 14 हजार 96 मतदार वाढले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघात 1 हजार 829 पुरुष, 1 हजार 698 स्त्री असे 3 हजार 527 नवमतदार वाढले आहेत. तिन्ही
मतदारसंघाचा विचार केला तर वाढलेले 36 हजार 458 मतदान कोणासाठी फायद्याचे ठरणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
“ती’ नावे वगळल्यानंतरही वाढले मतदार
निवडणूक विभागाने 15 जुलैला जिल्हा निवडणूक शाखेने प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली होती. त्यानंतर यादीवर हरकती घेणे, दुबार नावे, मयत, स्थलांतरित नावे वगळण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघातील अनेक नावे वगळण्यात आली. त्यानंतर नव्याने आलेली नावे वाढवण्यात आली. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीनंतर साधारणपणे 36 हजार नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
नाव नोंदवण्याची आणखी संधी
पुणे जिल्ह्यासाठी आलेल्या मतदान यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी जवळपास पूर्ण झाली आहे. तसेच वाढलेल्या मतदारानुसार मतदान केंद्र वाढवण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या जिल्हा निवडणूक शाखेने अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली आहे. तरीही आणखी काही नवमतदारांना आपली नावे नोंदवता येणार आहेत. उमेदवारांनी निवडणुकीसाठी माघार घेईपर्यंत मतदारांना आपली नावे मतदार यादीत नोंदविता येणार आहेत. या कालावधीत वाढलेली नावे ही नावे पुरवणी मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे.
शहरात आता 13 लाख मतदार
निवडणूक विभागाने प्रसिध्द केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार आता पिंपरी-चिंचवड शहरात 13 लाख 618 मतदार आहेत. त्यामध्ये पुरूष मतदार 6 लाख 97 हजार 34 तर महिला मतदार 6 लाख 3 हजार 525 आहेत. 59 तृतीतपंथी मतदार असल्याची नोंद आहे.