सावरदरेत वीज पडून तीन मेंढ्यांचा मृत्यू; शेतकऱ्याचे 30 हजारांचे नुकसान

सावरदरे (ता. भोर) : सावरदरे गावात बुधवारी (दि. 21 मे 2025) सायंकाळी अवकाळी पाऊस आणि वीजेच्या कडकडाटासह आलेल्या वादळाने हाहाकार उडवला. या वादळात राजेंद्र भोलाजी राऊत यांच्या शेतातील झाडावर वीज कोसळली, ज्यामुळे तिथे आसरा घेतलेल्या शेतकरी खंडू लक्ष्मण मदने यांच्या तीन मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकऱ्याचे अंदाजे 30 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
काय घडले?
संपूर्ण दिवसभर खंडू मदने आपल्या मेंढ्यांना शिवारात चारण्यासाठी घेऊन गेले होते. सायंकाळी अचानक जोरदार पाऊस आणि वादळ सुरू झाल्याने त्यांनी मेंढ्यांना राऊत यांच्या शेतातील एका झाडाखाली थांबवले. मात्र, काही क्षणांतच त्या झाडावर वीज कोसळली आणि विजेच्या तडाख्याने तीन मेंढ्या जागीच मृत पडल्या.
प्रशासनाची उदासीनता –
घटनेची माहिती गावचे सरपंच गणेश साळुंखे यांनी तत्काळ प्रशासनाला कळवली. त्यांनी तलाठी परमेश्वर जाधव यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला, परंतु त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. अखेर कोतवाल बाबा भंडलकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन मृत मेंढ्यांचा पंचनामा केला.
शेतकऱ्यांची मागणी –
या घटनेमुळे शेतकरी खंडू मदने यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. सावरदरे परिसरात मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून, अचानक येणाऱ्या वादळवाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
शेतीवरही परिणाम –
अवकाळी पावसामुळे गावातील शेतांमध्ये पाणी साचले असून, शेतीकामांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असून, लवकरच नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल, अशी माहिती मिळत आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी लावली आहे.





