छत्रपती संभाजीनगरात वीज पडून 4 जणांचा मृत्यू; दोन सख्या भावांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मान्सूनचा जोर वाढला असून, सिल्लोड तालुक्यात शनिवारी दुपारी वीज कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन सख्या भावांचा समावेश आहे. पेरणीच्या कामासाठी शेतात गेलेल्या या भावांवर विजेचा आघात झाला, तर अन्य दोन घटनांमध्ये आणखी दोघांचा बळी गेला. या ह्रदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे रोहित काकडे (वय 20) आणि यश काकडे (वय 17) हे सख्खे भाऊ आईसोबत शेतात पेरणी करत होते. अचानक वातावरण बदलले आणि जोरदार विजेचा कडकडाट सुरू झाला. यावेळी वीज थेट त्यांच्या अंगावर कोसळली, ज्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत मोढा बू. (ता. सिल्लोड) येथे रंजना बापुराव शिंदे (वय 50) या महिलेचा शेतात काम करताना विजेच्या आघाताने मृत्यू झाला. तिसरी घटना पिंपळदरी (ता. सिल्लोड) येथे घडली, जिथे शिवाजी सतीश गव्हाणे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा भाऊ जीवन गव्हाणे गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत.
मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला असून, छत्रपती संभाजीनगरात शनिवारी दमट वातावरणासह अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नांदेड आणि हिंगोलीत पावसामुळे केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या 10-12 दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.





