सावरदरेत वादळाने कोसळलेले विद्युत पोल अद्याप नादुरुस्त; शेतकरी अडचणीत

सावरदरे (भोर) : भोर तालुक्यातील सावरदरे परिसरात तीन आठवड्यांपूर्वी तीव्र वादळामुळे कोसळलेले विद्युत पोल आणि वीज वाहिन्या अद्याप दुरुस्त न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या समस्येची माहिती महावितरणच्या भोर विभागाला तातडीने देण्यात आली होती, परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांचे पेरणीपूर्व मशागतीचे काम ठप्प झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर वेळेवर पेरणी न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या ढिसाळ कारभाराविरोधात शिवप्रहार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने महावितरणच्या भोर कार्यालयाला निवेदन दिले आहे. आठ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास १६ जून रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणाले, “महावितरणने वेळेत लक्ष न दिल्यास भविष्यातील कोणतीही दुर्घटना ही महावितरणची जबाबदारी असेल.”
नैसर्गिक आपत्तीनंतर प्रशासनाची उदासीनता शेतकऱ्यांच्या संकटात भर घालत आहे. या घटनेची प्रत आणि निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि भोर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत होणे अत्यावश्यक आहे. महावितरण आता वेळेत कारवाई करते की आंदोलनानंतरच पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





