Pune District : साबुर्डीतील दलितवस्ती विजेने लखलखली

रवींद्र गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नांतून प्रथमच वीज मीटर, दिवे मिळाले
अजित पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य
राजगुरूनगर – साबुर्डी (ता. खेड) येथील दलितवस्तीत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने वीज मीटर व विद्युत दिवे जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्य रवींद्र गायकवाड यांनी विशेष प्रयत्नातून वाटप करण्यात आले. दलित वस्तीमध्ये प्रथमच वीज मीटर आणि वीज दिवे मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. वर्षानुवर्षे अंधारात चाचपडणार्या दलित बांधवांच्या घरात विजेचे दिवे लागल्याने वस्तीतील नागरिकाच्या चेहर्यावर जणू दीपावलीचे तेज चमकले.
साबुर्डी येथील देशमुखवाडी जवळच्या शेतात राहणार्या सहा बौद्ध कुटुंबाच्या घरात अद्यापही वीज पोहोचली नाही. या वस्तीवर वीज पोहोचावी, यासाठी साबुर्डीचे ग्रामपंचायत सदस्य गुलाब पाषाणकर यांनी जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्य रवींद्र ऊर्फ आबा गायकवाड यांच्याकडे मागणी केली होती. गायकवाड यांनी वस्तीवरील दलित बांधवांची गैरसोय प्रत्यक्ष पाहिली. तत्कालीन आमदार दिलीप मोहिते यांच्या मदतीने त्यांनी महिन्याभरात एक रोहित्र मंजूर करून घेतला. आठ विजेचे खांब टाकून विद्युतवाहिनी ओढली. ट्रान्सफॉर्मर उभा केला. वस्तीवर जायला रस्ताच नसल्याने विजेचे खांब ओढ्यानाल्यातून, गवतातून, शेताच्या बांधावरून डोक्यावरून जसे जमेल तसे वाहून नेले. सहा महिने सतत पाठपुरावा केला.
दरम्यान, वीज येऊनही मीटरची मागणी होत नसल्याने गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य पाषाणकर यांनी स्वतः पुढाकार घेत वस्तीवरील या गरीब कुटुंबांना आर्थिक मदत केली. वस्तीवरील पूजा घोडके या निराधार महिलेच्या घरगुती मीटरची अनामत रक्कम गायकवाड यांनी स्वतः भरली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वस्तीवर जाऊन हा मीटर घोडके यांच्या स्वाधीन केला. यावेळी रवींद्र गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गुलाब पाषाणकर, माजी सरपंच वंदना गोपाळे, शरद गोपाळे, समा गोपाळे, सुभाष गोपाळे, वेताळेचे माजी सरपंच विठ्ठल अप्पा बोंबले, बाबाजी वाळुंज, विकास गायकवाड उपस्थित होते. यासाठी महावितरणचे संचालक राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता युवराज जरग, कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके, उपकार्यकारी अभियंता उत्तम मंचरे, सहाय्यक अभियंता शरद जाधव यांनी अनमोल सहकार्य केले.
शेतातील वस्तीवर घरी जाण्यासाठी रस्ताच नाही. ओढ्यातून, झाडाझुडपातून जावे लागते. वस्तीवर लाइट नसल्याने मोठी गैरसोय होत होती लाइट यावी, यासाठी रवि गायकवाड यांनी खूप मेहनत घेतली. खांद्यावरून लाइटचे पोल आणायला लागले. त्यांनी आमच्या घरातला अंधार दूर नाय केला, तर आमच्या जीवनातील अंधार दूर केला आहे.
– पूजा घोडके,निराधार महिला
विजेअभावी दलित बांधवांची होणारी गैरसोय, शिक्षणातील अडचणी लक्षात घेत या वस्तीवर वीज पोचविण्याचे ठरवले होते. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी खूप मदत केली. त्यांच्या मदतीमुळेच हे शक्य झाले.
– रवींद्र गायकवाड, सदस्य, जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समिती





