वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; गावावर पसरली शोककळा

हिंगोली – तालुक्यातील दुर्गधामणी शिवारात शेतात झाडाखाली थांबलेल्या तरुण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ता. १२ सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
दुर्गधामणी येथील बिस्मील्लाखाँ गुलाम महम्मद खान (३०) यांचे दुर्गधामणी शिवारात शेत आहे. या शेतात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु आहेत. त्यानुसा बिस्मील्लाखाँ हे त्यांच्या आई, वडिलांसह गुरुवारी शेतात कामासाठी गेले होते.
सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. त्यामुळे त्यांचे आई, वडिल झोपडीत गेले तर बिस्मील्लाखाँ हे एका झाडाखाली आश्रयाला थांबले होते. काही वेळातच विजेचा कडकडाट होऊन वीज झाडावर पडली. त्यामुळे बिस्मील्लाखाँ जागीच कोसळले.
दरम्यान, काही वेळानंतर त्यांच्या कुटुंबियांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी बिस्मील्लाखाँ यांना उपचारासाठी हिंगोली येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले.





