पिंपरी, दि. 17 – पुरोगामी चळवळीत काम करत असल्याचा राग मनात धरून हे काम थांबव अन्यथा तुझाही दाभोळकर करू, अशी धमकी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांना देण्यात आली आहे. याप्रकरणी काळे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, 14 फेब्रुवारी 2023 रोजी एका लग्नानिमित्त आम्ही पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत मधील मधुरा लॉन्स येथे कुटुंबासमवेत गेलो होतो. लग्न झाल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास जेवणासाठी लाईनमध्ये थांबलो, त्यावेळी एका मुलाने माझ्याजवळ येत, तुम्हाला त्या समोर थांबलेल्या भाऊने बोलावले आहे, असे सांगितले. नंतर मी समोर पाहिले असता, सदर व्यक्ती ही मला हाताने स्वतःकडे येण्याचा इशारा करीत होती. मी त्याच्या जवळ गेलो, तर त्या व्यक्तीने माझ्याकडे रागाने बघत मला म्हटले, तू सतीश काळे आहेस ना ? मला ओळखलस का? मी अभिजीत शिंदे, पिंपरी गावात राहतो. बजरंग दलाचे काम करतो. खूप मस्ती आहे तुला. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर या विचारधारेशी तुला काय देणं-घेणं पडलंय. तू आता घरच्यांसोबत आलाय म्हणून तुला सोडतोय. खालपासून वरपर्यंत आमची सत्ता आहे. आमच्या हिटलिस्टवर तुझे नाव आहे. तुझे हे चाललेले काम थांबव अन्यथा आज ना उद्या तुझाही दाभोळकर सारखा शॉट करू, असे म्हणत अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत अभिजित शिंदे याने मला धमकी दिली, असे काळे यांनी तक्रारी अर्जात म्हटले आहे.
यापूर्वीही अनेक वेळा मला विविध माध्यमातून बजरंग दलाकडून जिवे मारण्याच्या तसेच माझा घातपात करण्याच्या धमक्या आलेल्या आहेत. भविष्यात अभिजीत शिंदे या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यामुळे किंवा त्याच्या हस्तकांमार्फत माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आम्ही प्रचंड मानसिक दडपणात आहोत. तरी या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सतीश काळे यांनी तक्रारी अर्जात केली आहे.