BJP MLA Lonikar | Ambadas Danve | भाजपाचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर बोलताना जीभ घसरली आहे. “तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले”, अशी भाषा लोणीकर यांनी केली आहे. इतकेच काय तर तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच असल्याचे लोणीकर म्हणाले. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर आता विरोधकांनी टीकास्त्र डागले आहे. उबाठासेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी लोणीकर यांच्या वादग्रस्त विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. दानवे यांनी एक्सवरून लोणीकर यांच्या वादग्रस्त विधानावर ही भाषा बरी नव्हे, तुमची आमदारकी या जनतेमुळेच असल्याचे म्हणत त्यांनी सुनावले. अंबादास दानवे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे. जनतेच्या अंगावरील कपडे, बूट याचा उल्लेख करताना लोणीकर यांनी आपल्या अंगावरील कपडे, बूट एवढेच नाही तर गाडीमधील डिझेलही या जनतेमुळेच आहे, याचे भान राखायला हवे, असा टोलाही दानवे यांनी लोणीकरांना लगावला आहे. काय म्हणाले दानवे? ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव. कारण.. तुमचे कपडे,बूट या जनतेमुळे.. आमदारकी जनतेमुळे.. तुमच्या गाडीतील डिझेल जनतेमुळे.. तुमचे विमानाचे तिकीट जनतेमुळे.. नेतेगिरी जनतेमुळे.. विधानसभेतील स्थान जनतेमुळे.. यांचे हे बोल लक्षात ठेवा. निवडणूक येते आहे, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी लोणीकर यांच्या विधानाचा समाचार घेतला. ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव. कारण.. तुमचे कपडे,बूट या जनतेमुळे.. आमदारकी जनतेमुळे.. तुमच्या गाडीतील डिझेल जनतेमुळे.. तुमचे विमानाचे तिकीट जनतेमुळे.. नेतेगिरी जनतेमुळे.. विधानसभेतील स्थान जनतेमुळे.. यांचे हे बोल लक्षात ठेवा. निवडणूक येते आहे! pic.twitter.com/RcSleViNGL — Ambadas Danve (@iambadasdanve) June 26, 2025 बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान बबनराव लोणीकर म्हणाले, “ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी 6 हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट अथवा चप्पल आमच्यामुळेच आहेत.” “तुझ्या हातातलं डबडं, तो देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?”, असे वादग्रस्त विधान लोणीकर यांनी केले आहे. जालना जिल्ह्यातील परतुर येथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणात बबनराव लोणीकर यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. हेही वाचा : “तुझ्या बापाला पेरणीला पैसे मोदींनी दिले, तुझ्या मायच्या, बहिणीच्या…”; भाजपा आमदाराची जीभ घसरली