“तुझ्या बापाला पेरणीला पैसे मोदींनी दिले, तुझ्या मायच्या, बहिणीच्या…”; भाजप आमदाराची जीभ घसरली

Babanrao Lonikar | भाजपाचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर बोलताना जीभ घसरली आहे. “तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले”, अशी भाषा लोणीकर यांनी केली आहे. इतकेच काय तर तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच असल्याचे लोणीकर म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टिकेची जोड उठली आहे.
नेमकं काय म्हणाले बबनराव लोणीकर ?
बबनराव लोणीकर म्हणाले, “ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी 6 हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट अथवा चप्पल आमच्यामुळेच आहेत.”
“तुझ्या हातातलं डबडं, तो देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?”, असे वादग्रस्त विधान लोणीकर यांनी केले आहे. जालना जिल्ह्यातील परतुर येथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणात बबनराव लोणीकर यांनी हे विधान केले आहे. मात्र आता त्यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. Babanrao Lonikar |
ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव. कारण..
तुमचे कपडे,बूट या जनतेमुळे..
आमदारकी जनतेमुळे..
तुमच्या गाडीतील डिझेल जनतेमुळे..
तुमचे विमानाचे तिकीट जनतेमुळे..
नेतेगिरी जनतेमुळे..
विधानसभेतील स्थान जनतेमुळे..यांचे हे बोल लक्षात ठेवा. निवडणूक येते आहे! pic.twitter.com/RcSleViNGL
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 26, 2025
ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती – अंबादास दानवे
ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी लोणीकरांच्या वक्तव्याचा व्हिडीओ एक्स या समाजमाध्यमावर शेअर करत लोणीकरांवरील नाराजी व्यक्त केली आहे. दानवे यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, “ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव, कारण… तुमचे कपडे, बूट या जनतेमुळे आहेत. तुमची आमदारकी जनतेमुळे… तुमच्या कारमधील डिझेल जनतेमुळे… तुमचे विमानाचे तिकीटही जनतेमुळे. तुमची नेतागिरी जनतेमुळे. तुमचं विधानसभेतील स्थानही जनतेमुळेच आहे. निवडणूक येतेय. तुमचं वक्तव्य लक्षात ठेवू,” असा इशाराच दानवे यांनी लोणीकरांना दिला आहे. Babanrao Lonikar |
हेही वाचा :
‘शक्तिपीठ महामार्ग’ ही महाराष्ट्राची आजची तातडीची गरज आहे का?; ‘सामना’ अग्रलेखातून सवाल





