Pune District : तहानलेल्या वन्यजीवांची तहान भागली
Pune District : ऐन पावसाळ्यात नैसर्गिक पाठवठे कोरडेठाक आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत वन्यप्राणी पिण्याच्या पाण्याची शोधात मानवी वस्तीमध्ये,मागील काही दिवसांपासून दिसू लागले होते.

वाल्हे : वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात ऐन पावसाळ्यात समाधानकारक पाऊस अद्यापपर्यंत पडला नसल्याने नैसर्गिक पाणवठ्यात पाणी उपलब्ध नसल्याने वनविभागाच्या माध्यमातून,कृत्रिम पाणवठ्यात बोअरवेल व टॅंकर च्या माध्यमातून भरून वन्यजीवांची तहान भागवली जात आहे.
ऐन पावसाळ्यात नैसर्गिक पाठवठे कोरडेठाक आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत वन्यप्राणी पिण्याच्या पाण्याची शोधात मानवी वस्तीमध्ये,मागील काही दिवसांपासून दिसू लागले होते.अनेक ठिकाणी तयार केलेले कृत्रिम पाणवठ्यात पाणी भरून ठेवणे गरजेचे असल्याने वनविभागाकडून हे कृत्रिम पाणवठे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
वाल्हे येथील भवानीमाता मंदिर परिसरातील डोंगर परिसरामधील वनक्षेत्रात विविध जातींचे अनेक पक्षी व वन्यजीवांसह चिंकारा जातीच्या हरणांची संख्या मोठी आहे. भवानीमाता डोंगर परिसरात सहा कृत्रिम पाणवठे असून या पाणवठ्यांमध्ये वनविभागाच्या वतीने सद्यःस्थितीत बोअरवेल सह्याने पाणी सोडण्यात येत आल्याने ते वन्यजीवांना वरदान ठरले आहेत.
मात्र, उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. चारा व पाण्यासाठी आजूबाजूच्या शेतात दिवसाही हरणांचे कळप निदर्शनास येत आहेत. डोंगर परिसरात असलेले लांडगे चारा-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असून अनेकवेळा शेळ्या- मेंढ्याच्या कळपावर तसेच घरासमोरील गोठ्यातील शेळी- मेंढ्या वरती हल्ला करीत आहेत.
चारा प्रश्न गंभीर
अन्नपाण्यासाठी पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग व पुणे-मिरज रेल्वे मार्गओलांडून ये – जा करताना वन्यजीवांचे अपघात झाल्याच्या अनेक घटना मागील काही वर्षांत घडल्या आहेत. यामध्ये अनेक वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. वनविभागाच्या माध्यमातून कृत्रिम पाणवठ्यात पाण्याची सोय केली तरी वाढत्या उष्णतेने चारा उपलब्ध नसल्याने वन्यजीव मानवी वस्तीत शेतातील पिकांत फिरू लागले आहेत. अन्न- पाणी-सावली उपलब्ध झाल्यास वन्यजीव मानवी वस्तीत येण्याचे थांबतील, अशी चर्चा ग्रामस्थांन मध्ये आहे.
वाल्हे व परिसरातील पाऊस अतिअल्प प्रमाणात पडला आहे; सध्या दिवसेंदिवस उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. परिसरातील नैसर्गिक पाणवठ्यात पाणी नाही. या पार्श्वभूमीवर वन्यजीवांसाठी पाण्याची गरज लक्षात घेऊन वाल्हे येथील भवानीमाता डोंगर परिसरामधील सहा कृत्रिम पाणवठे राख येथील १ कृत्रिम पाणवठे असून वनविभागाच्या वतीने या पाणवठ्यामध्ये बोअरवेल व टँकर च्या माध्यमातून पाणी सोडण्यात येत आहे. वनक्षेत्रात पाण्याची उपलब्धता झाल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत होणार आहे.
-दीपाली शिंदे, वनपाल, वाल्हे.





