Pune District : एकरी ऊस उत्पादनात यंदा घट – शेरकर
Pune District : ऊस गाळपाचा आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबर 2026 पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ओझर : जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 41व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन शनिवारी (दि. 26) सकाळी कारखान्याचे संचालक बाळासाहेब पांडुरंग घुले व त्यांच्या पत्नी वंदनाताई बाळासाहेब घुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
सन 2026-27 च्या गळीत हंगामासाठी कारखान्यातील सर्व यंत्रसामग्रीच्या देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून, विघ्नहर कारखाना गाळपासाठी सज्ज झाला आहे. यंदा गळीत हंगाम नेहमीपेक्षा लवकर सुरू होणार असला तरी कमी पावसामुळे उसाची वाढ खुंटली आहे. तसेच हुमणी किडीच्या प्रादुर्भावामुळे एकरी ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम कारखाना आणि ऊस उत्पादक शेतकरी या दोघांच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो, असे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी सांगितले.
ऊस गाळपाचा आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबर 2026 पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार विघ्नहर कारखान्याचा गाळप हंगाम वेळेत सुरू होणार आहे. यंदा 10 लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ऊस तोडणी व वाहतूक व्यवस्थेसाठी विविध यंत्रणांशी करार करण्यात आले आहेत. टायर बैलगाडी, ट्रॅक्टर टायरगाडी, गाडीसेंटर टोळी, डोकेसेंटर टोळी तसेच ऊस तोडणी यंत्रांच्या माध्यमातून ऊसतोडणी व वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
कारखान्याच्या आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले असून, त्यामुळे कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 5000 मेट्रिक टनांवरून 7500 मेट्रिक टनांपर्यंत वाढली आहे. चालू हंगामात दररोज 8 हजार ते 8 हजार 500 मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन आहे. तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यात येणार आहे. ऊस उत्पादन वाढविण्यासाठी ऊस उत्पादक शेतकर्यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन घ्यावे. कारखान्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणारी खते तसेच अन्य सुविधांचा लाभ घेतल्यास ऊस उत्पादन वाढण्यास निश्चितच मदत होईल, असे शेरकर यांनी सांगितले. येत्या गळीत हंगामातही सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांनी नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त ऊस विघ्नहर कारखान्यास गाळपासाठी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमास चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सुमित्राताई शेरकर, कार्यकारी संचालक भास्कर घुले, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, अधिकारी, कामगार युनियन, सेवक पतसंस्था, सांस्कृतिक मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच कर्मचारी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या इथेनॉल धोरणाचा विचार करून आसवनी प्रकल्पाच्या कामकाजाबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. देशातील साखर उत्पादनात घट झाल्यास सरकारकडून उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणण्याची शक्यता असल्याने कारखान्यांना इथेनॉल प्रकल्पाबाबत योग्य निर्णय घ्यावा लागेल,
-सत्यशील शेरकर, चेअरमन श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना





