Pune District : येणेरेत ना डीजे, ना लेझर
Pune District : एका पाठोपाठ एक गणेशमूर्ती डोक्यावर घेऊन चालणारे भाविक, गळ्यात टाळ, हातात मृदंग, मुखातून हरिनामाचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, असे मिरवणुकीचे चित्र होते.

जुन्नर : धार्मिक एकोप्यासाठी जुन्नर तालुक्यात वेगळी ओळख असलेल्या येणेरे गावाने यंदाही डीजे, लेझर आणि कर्णकर्कश आवाजाला फाटा देत पारंपरिक पद्धतीने गणरायाला निरोप दिला. गावातील गणेशभक्तांनी आपापल्या गणेशमूर्ती डोक्यावर घेऊन टाळ-मृदंगाच्या गजरात एकत्रित मिरवणूक काढली. येणेरे तसेच लगतच्या विठ्ठलवाडी येथे भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन सोहळा पार पडला.
एका पाठोपाठ एक गणेशमूर्ती डोक्यावर घेऊन चालणारे भाविक, गळ्यात टाळ, हातात मृदंग, मुखातून हरिनामाचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, असे मिरवणुकीचे चित्र होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत गावातील प्रत्येकजण या मिरवणुकीत सहभागी झाला होता. त्यामुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.
आधुनिक काळात अनेक ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे, लेझर, बँड आणि मोठ्या आवाजाच्या वाद्यांचा वापर केला जातो. मात्र, येणेरे-विठ्ठलवाडीने आपल्या पारंपरिक मिरवणुकीचे स्वरूप आजही जपले आहे. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही त्याच भक्तिभावाने पुढे नेण्यात आली. मिरवणुकीत सहभागी प्रत्येक भाविक एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून चालत होता.
कोण मोठा, कोण लहान, कोण श्रीमंत, कोण गरीब असा भेद न करता ‘बाप्पा आपला आणि गाव आपले’ या भावनेतून संपूर्ण गाव एकत्र आले. त्यामुळे विसर्जन मिरवणूक ही केवळ धार्मिक परंपरा न राहता गावातील सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणारी ठरली.
विसर्जनस्थळी सामूहिक महाआरती
विसर्जनस्थळी सर्व गणेशमूर्ती रांगेत विराजमान केल्यानंतर सर्व गणरायांची एकत्रित महाआरती करण्यात आली. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा गावाने आजही जपली असल्याचे येणेरेचे सरपंच अमोल भुजबळ यांनी सांगितले.





