Loni Kalbhor : विरोधकांचे आरोप बिनबुडाचे; पुराव्यांसह उत्तर देऊ
Loni Kalbhor : सभेच्या विषयपत्रिकेत कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्री केलेल्या 49.18 एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीची नोंद घेण्याचा विषय महत्त्वाचा आहे.

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील 22 हजार शेतकरी सभासदांशी जोडलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, जमीन विक्री, जुनी थकीत ऊस बिले, कामगारांचे पगार आणि कारखान्याच्या आर्थिक स्थितीवरून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांमुळे रविवारी (दि. 27) होणारी कारखान्याची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चर्चेची ठरण्याची शक्यता आहे.
कारखान्याची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी 11 वाजता सोरतापवाडी येथील कला गोविंद लॉन्स येथे होणार आहे. सभेच्या विषयपत्रिकेत कारखान्याची आर्थिक स्थिती, जमीन व्यवहार, जुनी व नवीन यंत्रसामग्री तसेच थकीत देणी यांसह विविध विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.
सभेच्या विषयपत्रिकेत कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्री केलेल्या 49.18 एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीची नोंद घेण्याचा विषय महत्त्वाचा आहे. तसेच नवीन अत्याधुनिक साखर कारखाना उभारण्यासाठी धोरण निश्चित करणे, जुन्या यंत्रसामग्रीबाबत निर्णय घेणे आणि त्यासाठी संचालक मंडळाला अधिकार देण्याचे प्रस्तावही सभेपुढे ठेवण्यात आले आहेत.
कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक निधीची उभारणी कशी केली जाणार, त्यासाठी जमीन व्यवहाराची भूमिका काय आहे, तसेच कारखान्याच्या आर्थिक अडचणींवर कोणत्या उपाययोजना करण्यात येणार, याबाबत सभासदांकडून प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. सन 2009-10 आणि 2010-11 या गाळप हंगामातील थकीत ऊस बिले तसेच जुलै 2011 ते ऑगस्ट 2018 या कालावधीतील कामगारांचे थकीत वेतन व अन्य देणी यांवरूनही सभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
कारखाना सुरू करण्यासाठी प्रशासनाचा प्रामाणिक प्रयत्न सुरू असून, त्यासाठी अनेक प्रशासकीय व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी सांगितले. कारखाना सुरू करण्यासाठी उपलब्ध पर्यायांमधून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांनी यापूर्वी स्वतः 117 एकर जमीन विक्रीचा ठराव मंजूर केला होता, तेच आता त्याला विरोध करीत आहेत.
मयत सभासदांच्या सह्यांबाबत करण्यात येणारे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. रविवारी होणार्या सभेत या सर्व प्रश्नांची पुराव्यांसह उत्तरे दिली जातील, असा दावा जगताप यांनी केला. त्यामुळे अध्यक्ष सुभाष जगताप विरोधकांच्या आरोपांना सभेत काय उत्तर देतात आणि सभासद या विषयांवर कोणती भूमिका घेतात, याकडे हवेली तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
‘यशवंत बचाव कृती समिती’चे आक्षेप
यशवंत बचाव कृती समिती’ने कारखान्याच्या कारभारावर आणि व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 117 एकर जमीन विक्रीच्या व्यवहारावर समितीने आक्षेप घेतला असून, मयत सभासदांच्या सह्यांबाबतही आरोप करण्यात आले आहेत. 2025 मध्ये जमीन विक्रीच्या प्रस्तावावरून वार्षिक सर्वसाधारण सभेत मतभेद झाल्याचेही समितीकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी होणार्या सभेत जमीन व्यवहार, थकीत देणी, कारखाना सुरू करण्याचे नियोजन आणि आर्थिक स्थितीवर सभासदांकडून कोणते प्रश्न उपस्थित होतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.





