Manchar : सौरऊर्जेने तालुका विजबिलमुक्त करण्यासाठी शरद बँकेने पुढाकार घ्यावा; माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन
Manchar :अवसरी खुर्द ता.आंबेगाव येथील कवयित्री शांता शेळके सभागृहात झालेल्या शरद बँकेच्या ५३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील प्रमुख मार्गदर्शन भाषणात बोलत होते.

मंचर : आंबेगाव-शिरूर तालुक्यातील प्रत्येक घरावर सौर पॅनेल बसवून तालुका विजबिलमुक्त करण्यासाठी शरद सहकारी बँकेने पुढाकार घ्यावा.तसेच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये,यासाठी बँकेने कर्ज योजना उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घ्यावा,असे आवाहन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवार, दि.२६ रोजी केले.
अवसरी खुर्द ता.आंबेगाव येथील कवयित्री शांता शेळके सभागृहात झालेल्या शरद बँकेच्या ५३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील प्रमुख मार्गदर्शन भाषणात बोलत होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे,भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती कैलासबुवा काळे,जिल्हा परिषदेचे सदस्य विष्णू काका हिंगे पाटील,बाजार समितीचे सभापती निलेश थोरात,आदिवासी नेते सुभाषराव मोरमारे,पंचायत समितीचे सदस्य संजय पवळे,शिवाजीराव निघोट, प्रा.दत्तात्रय भालेराव,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख, तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सुषमा शिंदे यांच्यासह संचालक आणि बँकेचे सभासद उपस्थित होते.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा अवलंब करून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा.कर्ज देताना कर्जदाराची परतफेड क्षमता तपासावी.ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे, त्याच कारणासाठी त्याचा वापर होतो का, यावर बँकेने लक्ष ठेवावे.शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभासदांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, सभेत सभासदांनी मांडलेल्या सूचनांवर योग्य कार्यवाही केली जाईल.बँक कमी कर्मचाऱ्यांमध्ये कार्यरत असून कर्मचाऱ्यांचे योगदान कौतुकास्पद आहे.जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक व कर्मचारी बँकेचा कारभार सक्षमपणे सांभाळत आहेत.
उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील म्हणाले,अकोले, मरकळ व उलवे येथे नवीन शाखा सुरू करण्याचे नियोजन आहे. डिजिटल व मोबाईल बँकिंगसह आधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणूक सुरू आहे.सभेत देवदत्त निकम, रमेश येवले, सचिन भोर, रवींद्र वळसे पाटील, राजू इनामदार,विठ्ठल भास्कर,दादाभाऊ पोखरकर यांच्यासह सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी प्रश्नांना उत्तरे दिली.सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले. आभार शिवाजीराव लोंढे यांनी मानले.





