Pune District : रात्रीच्या अंधारात चोरट्यांचा कहर! बेट भागातील ट्रान्सफॉर्मर आणि केबल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ
Pune District : तसेच रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी देखील या परिसरातील नागरिकांनी अनेकदा पोलीस प्रशासनाकडे केली असून या बाबतीत देखील अनेकदा वृत्तांकन करण्यात आले

जांबुत : शिरूर तालुक्यासह बेट भागात विद्युत ट्रान्सफार्मर आणि केबल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, विशेषतः पुणे जिल्ह्यात (जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड), इतर ग्रामीण भागांत चोरटे ट्रान्सफॉर्मर खाली पाडून आतील मौल्यवान तांब्याची कॉइल (तांब्याच्या तारा) आणि ऑइल लंपास करतात. अशीच दुर्घटना शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली असून शनिवारी (दि. २७) रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
या घटनेत १०० एच. पी. क्षमतेचे विद्युत रोहित्र (ट्रान्सफार्मर) जागेवर निकामी करुन त्यातील तांबे आणि इतर धातूसदृश्य वस्तू तसेच सुमारे वीस ते पंचवीस शेतकऱ्यांच्या अडीच ते तीन लाख रुपयांची केबल चोरी करून नेल्याची घटना घडली आहे. झालेल्या या घटनेबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून या केबल चोरांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
रात्रीच्या वेळी या परिसरात असलेले भारनियमन संपल्यानंतर रात्री साडेआकरा वाजेच्या सुमारास पुन्हा विद्युत प्रवाह चालू करण्यात आला होता. मात्र रात्री दीड वाजेच्या सुमारास लाईट गेल्यानंतर पुन्हा आलीच नाही. यावेळी सकाळी ट्रान्सफार्मर कडे काही शेतकरी पाहणी करण्यासाठी गेले असता ट्रान्सफार्मर आणि केबल चोरी झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आल्याचे शेतकरी संदीप बोंबे, प्रशांत बोंबे, दत्तात्रय बोंबे, अलंकार बोंबे यांनी सांगितले.
धक्कादायक बाब अशी की चोरी करण्यात आलेल्या केबल या चोरट्यानी एकाच जागेवर पुर्णपणे सोलून नेल्या असुन करण्यात आलेली चोरीची आधीच पाहणी करण्यात येऊन ही चोरी करण्यासाठी सुमारे १० ते १२ जणांची टोळी असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सध्या या भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत आहे. यामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, तरकारी पिके, पिण्याचे पाणी यासाठी शेतकऱ्यांना वीज अत्यंत महत्वाची आहे. या भागात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली असुन त्यात अशा प्रकारच्या घटना घडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे दिसून येते.
बेट भागात घडत असलेल्या घटनांचे गांभीर्य पोलीस प्रशासनाला राहिलेले नसून शिरूर पोलीस स्टेशन अंकित टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र हे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी असून अडचण, अन नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. या भागात अवैधपणे चालू असलेली दारू विक्री मटका आणि जुगार अड्डे तसेच छोट्या-मोठ्या चोऱ्या याबाबतीत अनेकदा पोलिसांचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे.
तसेच रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी देखील या परिसरातील नागरिकांनी अनेकदा पोलीस प्रशासनाकडे केली असून या बाबतीत देखील अनेकदा वृत्तांकन करण्यात आले. मात्र टाकळी हाजी येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना याबाबत कुठलेही गांभीर्य नसून अशाप्रकारे चोऱ्या होत राहिल्यास सर्वसामान्य शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा असाही प्रश्न निर्माण होत आहे.
पंधरा दिवसापूर्वी जांबुत (ता. शिरूर) येथे देखील दोन दिवस नियमितपणे चोरीचा प्रयत्न करण्यात येत होता त्याचबरोबर या भागात अवैध धंद्यांचे अधिकचे वाढलेले प्रमाण याकडे देखील अनेकदा पोलिसांचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे. तर या आधीच्या काळात या भागातील झालेल्या चोऱ्या दरोडे यांनी खून या घटनांच्या पार्श्वभूमीवर रात्रीची गस्त नियमितपणे चालू ठेवण्याची मागणी देखील अनेकदा करण्यात आली. मात्र टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राकडून याबाबत कोणतीही गंभीर दखल घेण्यात येत नाही. परिणामी टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राच्या कार्यक्षमतेवर कार्यक्षेत्रातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून याबाबत लवकरच राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे याबाबतीत लेखी तक्रार करणार असल्याचे काही पदाधिकारी, सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी सांगितले.





