Pune District : कासारीत पाण्यासाठी हंडा मोर्चा; संतप्त ग्रामस्थ, महिलांची ग्रामपंचायतीवर धडक
Pune District : दरम्यान, आंदोलकांनी मोकळे हंडे वाजवत पाणी द्या, पाणी द्या, ग्रामसेवक पाणी द्या, झोपलेले पुढारी जागे व्हा, आदी घोषणाबाजी करीत प्रशासनाचे भरदिवसा वाभाडे काढले.

शिक्रापूर : पावसाने देखील दडी मारल्याने नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. ग्रामपंचायतीकडे मागणी करुन देखील पाण्याचे टँकर सुरु होत नसल्याने कासारी (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढून पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. यावेळी संतापलेल्या ग्रामस्थ, महिलांनी जोरदार घोषणाबाजी करीत ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले.
कासारी येथील तलाव पूर्णपणे कोरडा झाल्याने नागरिक व शेतकऱ्यांना पिण्याच्या व चाऱ्यासाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली असल्याने स्थानिकांनी ग्रामपंचायतीकडे पाण्याचे टँकर सुरु करण्याची मागणी करुन देखील टँकर सुरु होत नसल्याने भाजप युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नवनाथ भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हातात मोकळे हंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करीत ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला.
यावेळी नवनाथ भुजबळ, राष्ट्रवादीचे संतोष काकडे, चक्रधर भुजबळ, अक्षय नेवसे, बापु नरके, प्रशांत सातपुते, योगेश नरके, निलेश नरके, हनुमंत नरके, शीतल भुजबळ, आरती काळकुटे, शांताबाई भुजबळ, शितल काळकुटे, अनिल भुमकर, लक्ष्मण काळकुटे, सुधीर फुलसुदर, दशरथ गोसावी, साहेबराव काळकुटे आदी उपस्थित होते. दरम्यान, आंदोलकांनी मोकळे हंडे वाजवत पाणी द्या, पाणी द्या, ग्रामसेवक पाणी द्या, झोपलेले पुढारी जागे व्हा, आदी घोषणाबाजी करीत प्रशासनाचे भरदिवसा वाभाडे काढले.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा व पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. प्रशासने पाण्याची समस्या सोडवली नाही तर ग्रामपंचायतीपुढे उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, शालेय समितीचे अध्यक्ष संतोष काकडे यांनी आभार मानले.
पाच दिवसांत पाणीप्रश्न मार्गी- पवार
कासारी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई असून यापूर्वी आम्ही पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवलेला असून गावातील एक विहिर देखील आरक्षित केलेली आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या माहितीनुसार ग्रामस्थांना पुढील पाच दिवसांमध्ये पाण्याचे टँकर सुरु केले जाणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी वसंत पवार यांनी सांगितले.





