Pune District : आंबोलीतील तीव्र पाणीटंचाईकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष?
. विशेषतः महिलांना आणि वृद्ध नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील हातपंपांवर पाणी भरण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत प्रतीक्षा करावी लागते.

शिंदे-वासुली : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वपूर्ण बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली गावात गेल्या चार महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना हातपंपांवर तासन्तास रांगा लावाव्या लागत असून, मोठ्या प्रयत्नांनंतर केवळ दोन हंडे पाणी मिळत असल्याची परिस्थिती आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
आंबोली गावात जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. त्यानंतर परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत गेली. गावातील विहिरी, पाणवठे आणि अन्य स्रोत आटत गेल्याने नागरिकांची पाण्यासाठीची धडपड वाढली आहे. विशेषतः महिलांना आणि वृद्ध नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील हातपंपांवर पाणी भरण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत प्रतीक्षा करावी लागते.
अनेकदा दिवसभर रांगेत उभे राहिल्यानंतरही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे घरगुती वापरासाठी आवश्यक असलेले पाणी मिळवणेही कठीण झाले आहे.
पूर्वी आंबोली गावासाठी अंभू येथून सायफन पद्धतीने पाणी आणून एका विहिरीमध्ये सोडण्यात येत होते. सध्या त्या विहिरीत काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. नळयोजनेद्वारे हे पाणी गावात सोडल्यास पाणीटंचाईची तीव्रता कमी होऊ शकते; मात्र विहिरीतील साठा संपुष्टात येण्याच्या भीतीने प्रशासनाकडून तो निर्णय घेतला जात नसल्याचे ग्रामस्थ मोहन शिंदे यांनी सांगितले. गावात पाणीटंचाई गंभीर स्वरूप धारण करूनही ग्रामपंचायतीकडून टँकर सुरू करण्यासाठी पंचायत समितीकडे कोणताही प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. परिणामी सध्या सुरू असलेल्या टँकर योजनेत आंबोली गावाचा समावेश झालेला नाही. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी यापूर्वी तीन वेळा हंडा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पुष्पाताई शिंदे यांनी गावातील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगताना, “पाण्यासाठी महिलांना अक्षरशः वणवण करावी लागत आहे. पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे ग्रामपंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत,” अशी खंत व्यक्त केली. अमृता शिंदे, संगीता दिवटे, शीतल सुतार, सीताबाई खुटवड, लीलाबाई शिंदे, मेघा सुतार, अलकाबाई सुतार आणि निखिल शिंदे यांसारख्या ग्रामस्थांनीही पाणीटंचाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “एका कुटुंबाला दिवसाला केवळ दोन हंडे पाणी मिळते. अशा परिस्थितीत घर चालवणे कठीण झाले आहे,” असे त्यांनी सांगितले.
ग्रामसेवकांशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे प्रशासनाची भूमिका स्पष्ट होऊ शकलेली नाही. सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त असल्याने स्थानिक प्रश्नांकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवून गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
आजी-माजी सरपंचांकडून व्यवस्था
दरम्यान, गावातील सरपंच तृप्ती संजय शिंदे आणि माजी सरपंच सुवर्णा अशोक खंडागळे यांनी त्यांच्या खासगी बोअरवेलमधून काही नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. मात्र ही व्यवस्था तात्पुरती असून गावाच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.





