Pune District : मुलींसाठी आरोग्य व समुपदेशनाचे धडे; महागणपती ग्रुप स्कूलमध्ये विविध समस्यांवर चर्चा
Pune District : मासिक पाळीबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून हा मुलींच्या आयुष्यातील नैसर्गिक बदल असल्याचे सांगण्यात आले.

रांजणगाव गणपती : येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या श्री महागणपती ग्रुप ऑफ स्कूलमध्ये मुलींसाठी विशेष समुपदेशन व आरोग्य जनजागृती सत्राचे आयोजन केले. उपक्रमात मुलींच्या आरोग्यविषयक समस्या, वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची काळजी तसेच दैनंदिन जीवनातील विविध अडचणींवर मोकळेपणाने चर्चा करण्यात आली.
सत्रामध्ये मुलींना मासिक पाळीविषयी वैज्ञानिक माहिती दिली. सॅनिटरी पॅडचा योग्य वापर, त्याची सुरक्षित विल्हेवाट आणि वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मासिक पाळीबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून हा मुलींच्या आयुष्यातील नैसर्गिक बदल असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी शाळेत व दैनंदिन जीवनात मुलींना भेडसावणाऱ्या विविध समस्या जाणून घेण्यात आल्या. कोणत्याही अडचणीबाबत विद्यार्थिनींनी संकोच न बाळगता शिक्षक, शिक्षिका किंवा मुख्याध्यापकांशी संवाद साधावा, असे आवाहन केले. मुलींचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता ही संस्थेची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी महागणपती इंग्लिश मीडियम स्कूलच्या उपमुख्याध्यापिका अबेदा आत्तार, अक्षरनंदन गुरुकुल स्कूलच्या मुख्याध्यापिका वंदना खेडकर, श्री महागणपती ग्लोबल स्कूलच्या मुख्याध्यापिका पद्मिनी कवठेकर, उपमुख्याध्यापिका सोनाली नलवडे, स्मिता गोळे, सुकन्या साठे, स्वाती दंडवते आदी मान्यवर उपस्थित होत्या.
आत्मविश्वास वृद्धिंगत होईल
विशेष सत्रात मान्यवरांनी मुलींशी संवाद साधत संस्था ‘आपल्या पाल्यास आईच्या मायेने जपणारी’ या ब्रीदवाक्यानुसार विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. सत्राच्या शेवटी विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली. उपक्रमामुळे मुलींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यासोबतच आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षक व शिक्षिकांनी व्यक्त केला.





