Eknath Shinde : ही लोकं एक दिवस जळून खाक होणार; एकनाथ शिंदेंचा रोख नेमका कोणाकडे?

नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर दौऱ्यावर आले असून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते सहभागी होत आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ही लोकं किती जळले, किती जळणार, एक दिवस जळून खाक होणार असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे म्हणाले, मला महादजी शिंदे पुरस्कार मिळाला, शरद पवार यांच्याहस्ते हा पुरस्कार दिला गेला. एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी व्यक्तीला पुरस्कार देतो, आणि महादजी शिंदेंसारख्या पराक्रमी महापुरुषाच्या नावाने पुरस्कार दिला जातो, त्यासंदर्भात ही लोकं किती जळले, किती जळणार, एक दिवस जळून खाक होणार, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर केली.
शरद पवार यांचाही अपमान केला : शिंदे
पुढे बोलताना म्हणाले, पुरस्कार सोहळ्यातून शरद पवार यांचाही अपमान करण्यात आला, साहित्यिकांना दलाल म्हणून त्यांचा अपमान केला, महादजी शिंदे यांच्या वंशजांचाही अपमान केला. कधी तरी सुधरा, माझ्यावर कितीही आरोप करा, शिव्या द्या, जोवर जनता आमच्यासोबत आहे काहीच होणार नाही, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
काही लोक धक्कापुरुष झाले आहेत : एकनाथ शिंदे
मी आता धक्कापुरुष झालोय, उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भाष्य करत म्हणाले, काही लोक धक्कापुरुष झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत लोकांनी धक्का देऊन त्यांना बाहेर बसवले आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना धक्का दिला, बाळासाहेबांचा विचार सोडला आहे. पक्षातील चांगल्या लोकांना धक्का मारून पक्षाबाहेर काढणारे जे नेते आहे, जनता त्यांना धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच, शिवसैनिक आमच्यासोबत येत आहेत, विश्वास दाखवत आहेत, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.





