Maharashtra Politics : ठाकरे गटात मोठा भूकंप ! 12 नगरसेवक बंड करणार? थेट पत्रकार परिषद घेत…
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या सुरू असलेले भूकंपाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. शिवसेना ठाकरे गटाला (Maharashtra Politics) एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत असून पक्ष मोठी गळती अनुभवत आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या सुरू असलेले भूकंपाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. शिवसेना ठाकरे गटाला (Maharashtra Politics) एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत असून पक्ष मोठी गळती अनुभवत आहे. आधी सहा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला, तर त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे सेनेची वाट धरली.
हा राजकीय धक्का ताजा असतानाच आता नाशिकमध्येही ठाकरे गटाला मोठे भगदाड पडण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे सुमारे १० ते १२ नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असून ते लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेतील ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता (Maharashtra Politics) निर्माण झाली असून, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गटनेता कार्यालयात तातडीने एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर ठाकरे गटाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली, ज्यात अनेक खळबळजनक खुलासे आणि दावे करण्यात आले आहेत.
या पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका मांडली. पोरजे यांनी पक्षातील फुटीच्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या आणि हा केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पक्षाचा कोणताही नगरसेवक फुटणार नाही. कालच आम्ही सर्व जण महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो आणि त्यावेळी आमच्यासोबत १३ नगरसेवक उपस्थित होते.
त्यामुळे नगरसेवक पक्षांतर करणार असल्याच्या बातम्या केवळ अफवा आहेत. आमच्या मनात एकमेकांबद्दल संशयाची भावना निर्माण व्हावी आणि आम्ही एकमेकांकडे संशयाने पाहावे, म्हणूनच जाणीवपूर्वक असा प्रयत्न केला जात आहे.
पुढे बोलताना केशव पोरजे यांनी थेट ‘५ कोटींच्या ऑफर’चा खळबळजनक आरोप केला. भविष्यात ज्यांना मोठी पदे मिळवायची आहेत किंवा ज्यांना उपमहापौर बनण्याची इच्छा आहे, तेच अशा प्रकारांमागे असून त्यांनी ठाकरे गटाच्या नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी आपले एजंट पाठवले असल्याचा दावा पोरजे यांनी केला.
हा कथित एजंट आतापर्यंत ५ ते ६ नगरसेवकांना भेटला असून विकासकामांच्या नावाखाली त्यांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांची मोठी ऑफर दिली जात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
या राजकीय खेळीवर आणि प्रशासनाच्या भूमिकेवर कडाडून टीका करताना पोरजे म्हणाले की, महापालिका प्रशासनाकडून ठाकरे गटाच्या नगरसेवकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. आमच्या नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी दिला जात नाही, तसेच महापालिकेचे अधिकारीही त्यांच्या प्रश्नांकडे आणि मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात.
नगरसेवकांना निधी न देऊन आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना इतके कंटाळवायचे की त्यांनी स्वतःहून दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा, अशी ही पद्धतशीर रणनीती आखली जात आहे. राम मंदिराच्या मूळ मुद्द्यावरून लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठीच (Maharashtra Politics) अशा आर्थिक देवाणघेवाणीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, जे दोन-चार नगरसेवक घेऊन बाजूला होतील, ते कायदेशीररित्या अपात्र ठरतील.
तसेच खासदारांच्या फुटीनंतर पक्ष प्रमुखांनी जसा ‘तुडवा’ असा आदेश दिला होता, त्याचप्रमाणे जे नगरसेवक पक्षाशी गद्दारी करून जातील, त्यांना नाशिकची जनता रस्त्यावर तुडवल्याशिवाय राहणार नाही, असा संतप्त इशाराही त्यांनी दिला.
ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन पक्षात सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्ष परिस्थितीने मात्र या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक महानगरपालिकेत ठाकरे गटाकडे एकूण १५ नगरसेवक आहेत, परंतु या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला या १५ पैकी केवळ ५ नगरसेवकच उपस्थित होते.
गटनेत्यांनी कितीही मोठे दावे केले तरी बहुतांश नगरसेवकांनी पत्रकार परिषदेला लावलेली दांडी बऱ्याच गोष्टी सांगून जाणारी आहे. नगरसेवकांच्या या मोठ्या अनुपस्थितीमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना आणि संशयाला प्रचंड उधाण आले आहे. त्यामुळे पोरजे यांचा दावा खरा ठरतो की नाशिकमध्ये ठाकरे गटाला खरोखरच मोठा धक्का बसतो, हे येणारा काळच ठरवेल.






