मुंबई – बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेण्याच्या बदल्यात, अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी एफआयआर दाखल करून घेण्याची आपली मागणी पूर्ण करून घेण्याची संधी विरोधकांकडे होती, असे ठाकरेसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, भाजपचा मुखवटा फाडण्याची संधी विरोधी पक्षांकडे होती, असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेसने आपला उमेदवार आकाश मोरे यांची माघार घेतल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला राऊत हे उत्तर देत होते. संजय राऊत म्हणाले, रोहित पवार एफआयआर दाखल करून घेण्याच्या आपल्या मूळ मागणीकडे दुर्लक्ष का करत आहेत? एफआयआर दाखल करून घेण्यासाठी आणि भाजपचा मुखवटा फाडण्यासाठी हीच योग्य संधी आहे. एफआयआर दाखल झाल्यास आपण बारामती पोटनिवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेऊ, असे काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले होते. अजित पवार यांच्या मृत्यूच्या संदर्भात एफआयआर दाखल करण्याची मागणी ही सुनित्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार व जय पवार यांनी करायला हवी होती, असे राऊत म्हणाले. Ajit pawar plane crash बारामती मतदारसंघातून उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेणे आवश्यक ठरले आहे. ही पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता एकूण २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. या विमान अपघाताप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी राज्यातील विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. विमान अपघाताचा तपास करण्यासाठी एफआयआर दाखल होणे गरजेचे आहे मात्र, ज्या विमान कंपनीचे विमान कोसळले होते, त्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबतही सरकार उदासीन असल्याचे दिसून येत आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली होती आणि त्यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार आकाश मोरे यांना निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेण्यास सांगावे, अशी विनंती केली होती.