Pune District : दमदार पाऊस पडेना अन् शेती काही पिकेना
Pune District : पावसाचे तीन महिने संपले तरी या भागात अद्याप एकही मुसळधार पाऊस नाही. त्यामुळे परिसरातील ओढे-नाले, तलाव, बंधारे अजूनही कोरडेठाक दिसत आहेत.

वाल्हे : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत दमदार पाऊस पडला आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत अद्याप मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होत आहेत.
पावसाळ्यांचे तीन महिने संपत आले तरीही, पुरेशा पावसाअभावी पुरंदर तालुक्याचा दक्षिण-पूर्व भाग अजूनही कोरडाठाक पाहायला मिळत आहे. तर काही गावातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू असून ऐन पावसाळ्यात टॅंकर आणखी सुरू करण्याची मागणी देखील पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
पुरंदर तालुक्याचा दक्षिण – पूर्व भाग हा दुष्काळी पट्ट्यात येत असून बहुतांश क्षेत्र हे कोरडवाहू आहे. या भागातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी तर मान्सूनपूर्व पावसाने ही दडी मारल्याने, शेतकरीवर्गाची खरीप हंगामातील पेरणी उशीरा झाली आहे. पावसाचे तीन महिने संपले तरी या भागात अद्याप एकही मुसळधार पाऊस नाही. त्यामुळे परिसरातील ओढे-नाले, तलाव, बंधारे अजूनही कोरडेठाक दिसत आहेत.
दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यात खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. तसेच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बाजरीच्या खुरपण्या सुरु व्हायला पाहिजे होत्या. मात्र, जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात रिमझिम पाऊस सोडून मोठा पाऊस पडला नसल्याने परिसरात खरीप हंगामातील पिके तुरळक पावसावर अद्यापपर्यंत तग धरून आहेत. मात्र, दमदार पाऊस पडला तरच, ही पिके सुस्थितीत येतील.
सद्यःस्थितीत खरीप हंगामातील बहुतांश पिकांची खुरपणी झाली आहे. या पिकांना पाण्याची तसेच खते टाकण्याची नितांत गरज आहे. मात्र, दमदार पाऊस पडत नसल्याने शेतकरीवर्ग खरीप हंगामातील पिकांना खाद्य घालावे की नाही? या द्विधा मनःस्थितीत आहे. पाऊस पडला नाही तर, शेतातील पिकांवर केलेला खर्च वाया जाईल, अशी चिंता आहे.
अद्याप बळीराजा आशावादी
ऐन पावसाळ्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या बळीराजाला आता हवामान खात्याकडून व त्याचबरोबर प्रत्यक्षात होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे काहीसा आता आशावादी होत आहे. ‘लवकरात लवकर’ दमदार पाऊस पडावा,अशी आशा मनी बाळगून बळीराजा हा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.





