Pune District : पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक नियोजनाचा बोजवारा
Pune District : अनेक ठिकाणी तासन्तास वाहने जागच्या जागी उभी राहिल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली. अखेर बंद केलेले चौक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चिंबळी : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत असताना, कोंडी सोडविण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजनांवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहतूक पोलिसांकडून विविध प्रयोग करून काही महत्त्वाचे चौक बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले; मात्र या नियोजनामुळे कोंडी सुटण्याऐवजी पर्यायी मार्ग आणि वळणांवर वाहनांचा ताण वाढला. अखेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने बंद केलेले काही चौक पुन्हा सुरू करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. त्यामुळे वाहतूक नियोजनातील त्रुटी पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आल्या आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण, खेड आणि राजगुरुनगर परिसर औद्योगिक वसाहतींमुळे अत्यंत गजबजलेला आहे. या मार्गावर दररोज हजारो अवजड कंटेनर, ट्रक, कामगारांची वाहने आणि अन्य वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. परिणामी, प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीचा ताण वाढून अनेकदा पाच ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.
मुख्य चौकातील कोंडी कमी करण्याच्या प्रयत्नात वाहतुकीचा भार अन्य ठिकाणी सरकल्याने वाहनचालकांचा गोंधळ वाढला. अनेक ठिकाणी तासन्तास वाहने जागच्या जागी उभी राहिल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली. अखेर बंद केलेले चौक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चाकण औद्योगिक पट्ट्यात रस्त्याच्या कडेला अवजड वाहनांचे होणारे अनधिकृत पार्किंग ही वाहतूक कोंडीची आणखी एक गंभीर समस्या आहे. कंटेनर आणि ट्रक रस्त्याचा मोठा भाग व्यापून उभे राहत असल्याने उपलब्ध रस्त्याची रुंदी कमी होते. त्यामुळे आधीच मोठ्या प्रमाणावर असलेल्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. महामार्गावर काही ठिकाणी सुरू असलेली संथ गतीची कामे, काँक्रिटीकरण, खड्डे तसेच अपूर्ण कामांमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी झाली आहे. परिणामी, काही ठिकाणी निर्माण होणारे ‘बाटलीच्या मानेसारखे’ अरुंद भाग वाहतुकीच्या कोंडीचे केंद्र बनत आहेत. त्यातच वाहतूक नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या दिशेने येणारी वाहने, अचानक मार्ग बदलणारे वाहनचालक आणि चौकांमध्ये शिस्त न पाळल्याने परिस्थिती आणखी बिकट होत आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. कोंडीवर तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता असल्याचे स्थानिक नागरिक आणि उद्योग क्षेत्रातील घटकांकडून सांगण्यात येत आहे. महामार्गावरील उड्डाणपूल, बायपास तसेच अन्य प्रलंबित पायाभूत सुविधांची कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणीही सातत्याने होत आहे.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन प्रयोग करण्याऐवजी स्थानिक परिस्थिती, अंतर्गत रस्ते, औद्योगिक वाहतूक आणि अवजड वाहनांची संख्या यांचा एकत्रित अभ्यास करून कायमस्वरूपी वाहतूक आराखडा तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बंद केलेले चौक पुन्हा सुरू करण्याची वेळ आल्याने सध्याच्या वाहतूक नियोजनाचा फेरआढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
‘नो कट’, ‘नो राईट टर्न’चा प्रयोग फसला?
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही प्रमुख चौकांवर ‘नो कट’ आणि ‘नो राईट टर्न’चे नियम लागू करून चौक तात्पुरते बंद करण्यात आले होते. वाहनांना पुढे जाऊन वळसा घेऊन परत येण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात या उपायामुळे पर्यायी मार्गांवर तसेच वळणाच्या ठिकाणी वाहनांची गर्दी वाढली.





