Pune District : साखरेच्या महागाईने खाद्य व्यवसायांचे गणित बिघडले
Pune District : विशेषतः लहान दुकानदारांकडे मोठ्या कंपन्यांप्रमाणे साठवणूक क्षमता आणि आर्थिक तरतूद नसल्याने त्यांना रोजच्या खरेदीवरच व्यवसाय चालवावा लागतो.त्यामुळे दरवाढीचा परिणाम त्यांच्या दैनंदिन उलाढालीवरही जाणवत आहे.

मंचर : साखरेच्या दरात झालेल्या विक्रमी वाढीचा फटका आता मोठ्या अन्नप्रक्रिया कंपन्यांसोबतच लघु खाद्य व्यवसायांनाही बसू लागला असून छोट्या खाद्य व्यवसायांचे गणित बिघडले आहे.
किरकोळ बाजारात साखरेचे दर अनेक ठिकाणी ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने मिठाईची दुकाने, बेकरी, चॉकलेट व बिस्किट उत्पादक, आईस्क्रीम विक्रेते, रसविक्री केंद्रे, चहा-कॉफी दुकाने तसेच घरगुती खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे मिठाईसारखी पदार्थ महागले आहे.
मिठाई, केक, बिस्किटे, शीतपेये आणि चहासारख्या पदार्थांमध्ये साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे साखरेच्या दरवाढीचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होत असून, छोट्या व्यावसायिकांच्या नफ्याचे प्रमाण घटत आहे. आधीच वाढलेले दूध, तूप, तेल, मैदा, गॅस आणि इतर कच्च्या मालाचे दर यामुळे खर्चाचा ताण वाढला असताना साखरेच्या दरवाढीने त्यात आणखी भर पडली आहे.
सणासुदीचा काळ जवळ आल्याने मिठाई व खाद्यपदार्थांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच वेळी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने व्यावसायिकांसमोर उत्पादन खर्च ग्राहकांकडून वसूल करायचा की नफा कमी करून व्यवसाय सुरू ठेवायचा, असा पेच निर्माण झाला आहे. ग्राहकांवर अचानक दरवाढ लादल्यास मागणीवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. व्यावसायिकांच्या मते, साखरेचे दर आणखी वाढल्यास काही पदार्थांच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
मात्र, दरवाढीमुळे ग्राहक कमी प्रमाणात खरेदी करू लागल्यास उलट व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः लहान दुकानदारांकडे मोठ्या कंपन्यांप्रमाणे साठवणूक क्षमता आणि आर्थिक तरतूद नसल्याने त्यांना रोजच्या खरेदीवरच व्यवसाय चालवावा लागतो.त्यामुळे दरवाढीचा परिणाम त्यांच्या दैनंदिन उलाढालीवरही जाणवत आहे. साखरेच्या वाढलेल्या दरामुळे साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी मिठाई, बेकरी आणि इतर लघु खाद्य व्यवसायांसाठी ही दरवाढ कडू ठरत आहे. उत्पादन खर्च आणि विक्रीदर यांचा समतोल राखण्यासाठी बाजारातील साखरेचे दर स्थिर राहण्याची गरज व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.





