Pune District : सोमेश्वर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम
Pune District :सोमेश्वर कारखान्याची अंतिम मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे विविध राजकीय गटांनीही आपापली मोर्चेबांधणी सुरू केली असून, इच्छुक उमेदवारांनी सभासदांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे.

सोमेश्वरनगर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर कारखाना कार्यक्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध गावांमध्ये घोंगडी बैठका आयोजित करून कारखान्याच्या सभासदांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
मुरूम, वाणेवाडी, करंजे, शेंडकरवाडी, मगरवाडी, वाकी, चौधरवाडी आणि खंडोबाचीवाडी या गावांमध्ये नुकत्याच बैठका घेण्यात आल्या. या बैठकींमध्ये कारखान्याची सद्यस्थिती, साखरेच्या दरातील वाढ, सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, ऊस उत्पादकांना मिळणारा दर तसेच आगामी निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी तसेच गावोगावी जाऊन सभासदांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या भावना, अपेक्षा आणि कारखान्याबाबतच्या सूचना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. घोंगडी बैठकीच्या माध्यमातून थेट सभासदांपर्यंत पोहोचण्याची ही रणनीती सध्या कारखाना परिसरात चर्चेचा विषय ठरत असून, या संवाद बैठकींना सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
सोमेश्वर कारखान्याची अंतिम मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे विविध राजकीय गटांनीही आपापली मोर्चेबांधणी सुरू केली असून, इच्छुक उमेदवारांनी सभासदांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेशाच्या निमित्ताने मुरूम येथे आयोजित मेळाव्यात तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासदांशी साधलेल्या संवादातून कारखाना निवडणुकीत सक्रिय भूमिका घेण्याचे संकेत दिले होते. या मेळाव्यास मिळालेल्या सभासदांच्या प्रतिसादानंतर आता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून गावपातळीवर बैठका घेऊन सभासदांशी थेट संपर्क वाढविण्यात येत आहे.
या संपर्क मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, माजी पुणे जिल्हा परिषद सभापती दत्ता चव्हाण, माजी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे, प्रदीप गीते, अनिल शहा, प्रवीण भोसले, प्रदीप शेंडकर, सागर मदने, निवृत्ती शेंडकर, केतन भोसले, शशीभाऊ काकडे, राजेंद्र लकडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सभासद आणि मतदारांशी संवाद साधत आहेत.
स्थानिक गटांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
दरम्यान, निवडणूक बिनविरोध होणार की विविध राजकीय गट स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याबाबत सभासदांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच स्थानिक गटांच्या भूमिकेकडेही कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांचे लक्ष लागले आहे. एकीकडे बिनविरोध निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे विविध गावांमध्ये सुरू झालेल्या बैठका आणि संपर्क मोहिमांमुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचा रणसंग्राम हळूहळू रंगू लागल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कारखाना परिसरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





