Pune District : गुऱ्हाळमालकांनी ऊस दराची कोंडी फोडली
Pune District : मांडवगण येथेही सभा घेण्यात आली. सभेत उसाला किमान ५००० रुपये प्रतिटन दर मिळाला पाहिजे, अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली. (दि.२६) पारगाव येथे सायंकाळी शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.

पारगाव : उसाला अपेक्षित दर मिळावा, यासाठी गेल्या तीन दिवसांपासून शिरूर आणि दौंड तालुक्यात गावोगावी शेतकरी एल्गार सुरू असून शेतकऱ्यांच्या एकजुटीचा परिणाम आता दिसून येत आहे. नागरगाव येथे झालेल्या शेतकरी एल्गार सभेत उसदराची कोंडी फुटली. गुऱ्हाळमालक एकनाथ शेलार यांनी शेतकऱ्यांच्या उसाला ४३०० रुपये प्रतिटन दर देण्याची घोषणा केली.
रांजणगाव येथे झालेल्या शेतकरी एल्गार सभेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. अपेक्षित दर मिळाला नाही, तर सध्या सुरू असलेल्या ऊसतोडी वगळता (दि.५) सप्टेंबरपर्यंत ऊसतोड बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय या सभेत घेण्यात आला होता. त्यामुळे उसदराचा प्रश्न अधिकच गंभीर बनला होता.
दरम्यान, नागरगाव येथे झालेल्या शेतकरी एल्गार सभेत उसाच्या दराबाबत चर्चा सुरू असतानाच गुऱ्हाळमालक एकनाथ शेलार यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या उसाला ४३०० रुपये प्रतिटन बाजारभाव देणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थित शेतकऱ्यांनी स्वागत केले. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने एकनाथ शेलार यांचा सत्कार करण्यात आला.
मांडवगण येथेही सभा घेण्यात आली. सभेत उसाला किमान ५००० रुपये प्रतिटन दर मिळाला पाहिजे, अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली. (दि.२६) पारगाव येथे सायंकाळी शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.
शिरूरमध्ये तोडगा निघाला
महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यानंतर सर्वाधिक गुऱ्हाळे दौंड तालुक्यात आहेत. सध्या तालुक्यात ७०० गुऱ्हाळे सुरू आहेत. दौंड तालुका ऊस उत्पादनातही जिल्ह्यात आघाडीवर आहे. तरी उसदराची कोंडी शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे फुटत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांची एकजूट, सामूहिक निर्णय आणि योग्य दरासाठीचा संघर्ष यामुळे उसदराच्या प्रश्नाला आता निर्णायक वळण मिळाले असून, नागरगावमध्ये जाहीर झालेला ४३०० रुपयांचा दर हा शेतकरी एकजुटीचा विजय मानला जात आहे.
बदलाचा परिणाम शेतकऱ्यांवर
७० रुपये साखरेचा दर ६२ रुपयांवर आला असून, गुळाचा दर सुद्धा ६५ रुपयांवरून ५२ ते ५५ रुपयांपर्यंत खाली आला असल्याने सध्यस्थितीत उसाचे दर निश्चित करणे अवघड जात आहेत. एकदा ऊस तोडण्यासाठी सुरु केल्यानंतर त्याचा पुढील १५ दिवस पुन्हा दर ठरविता येत नाही. बाजार स्थिर होतील, त्यावेळी यावर निर्णय घेणे योग्य राहील, अशी माहिती गुऱ्हाळ मालकांकडून मिळत आहे. दरम्यान, गुळाच्या बाजारभावातील बदलाचा थेट परिणाम ऊस उत्पादकांच्या अपेक्षांवर होत असून ऊसदराच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





