ICC Awards : असा ‘किंग’ होणे नाही! आयसीसी अॅवार्ड्स जिंकण्यातही ‘विराट कोहली’च आहे आघाडीवर….

Virat Kohli ICC Awards : आयसीसी अॅवार्ड्स पटकवण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. कोहली हा आतापर्यंत सर्वाधिक वैयक्तिक आयसीसी अॅवार्ड्स पटकावणारा ठरला खेळाडू आहे. कोहलीला 2023 साठी ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयरचा किताब देण्यात आला. या विजेतेपदासह कोहलीच्या नावावर एकूण 10 वैयक्तिक आयसीसी पुरस्कार झाले आहेत.
आयसीसी अॅवार्ड्स पटकवण्याच्या बाबतीत श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा आणि माजी भारतीय कर्णधार एमएम धोनी संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोन्ही खेळाडूंनी आपापल्या कारकिर्दीत 4 वैयक्तिक आयसीसी अॅवार्ड्स जिंकले आहेत. पण कोहलीने 10 वैयक्तिक आयसीसी अॅवार्ड्स जिंकले आहेत. म्हणजेच आयसीसी अॅवार्ड्स जिंकण्याच्या बाबतीत कोणताही खेळाडू कोहलीच्या जवळपासही नाही.
कोहली पहिल्यांदाच नव्हे तर चौथ्यांदा ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर ठरला आहे. त्याने पहिल्यांदा हे विजेतेपद 2012 मध्ये जिंकले होते, जेव्हा तो केवळ 24 वर्षांचा होता. आता वयाच्या 35व्या वर्षी त्याने चौथ्यांदा हा पुरस्कार जिंकला. दरम्यान, कोहली 2017 आणि 2018 मध्ये ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर ठरला.
या वर्षीच्या ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासह, कोहली 10 ICC पुरस्कार जिंकणारा पहिला क्रिकेटर बनला आहे. याशिवाय तो चार वेळा ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारा पहिला क्रिकेटर बनला. त्यामुळे आता असा किंग होणे नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
कोहलीचे एकूण 10 आयसीसी पुरस्कार…
1. क्रिकेटर ऑफ द डीकेड- 2010
2. वनडे क्रिकेटर ऑफ द डीकेड- 2010
3. वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर- 2012
4. वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर- 2017
5. क्रिकेटर ऑफ द ईयर- 2017
6. क्रिकेटर ऑफ द ईयर- 2018
7. टेस्ट क्रिकेट ऑफ द ईयर- 2018
8. वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर- 2018
9. स्प्रिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड- 2019
10. वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर- 2023
तिन्ही क्रिकेट प्रकारात दमदार कामगिरी…
विराट कोहली हा क्रिकेटच्या इतिहासातील अशा मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे ज्यांच्याकडे तिन्ही फॉरमॅटशी जुळवून घेण्याची आणि चमकदार कामगिरी करण्याची क्षमता आहे. आत्तापर्यंत भारतीय फलंदाजाने 113 कसोटी, 292 एकदिवसीय आणि 117 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
कसोटीच्या 191 डावांमध्ये, त्याने 29 शतके आणि 30 अर्धशतकांच्या मदतीने 8,848 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 254* धावा आहे.
याशिवाय एकदिवसीय सामन्यांच्या 280 डावांमध्ये फलंदाजी करताना कोहलीने 58.67 च्या सरासरीने 13,848 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 50 शतके आणि 72 अर्धशतके केली आहेत. कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे.
तर T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 109 डावांमध्ये कोहलीच्या बॅटने 4,037 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 51.75 च्या सरासरीने आणि 138.15 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 1 शतक आणि 37 अर्धशतके झळकावली आहेत. कोहली या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.





