Nana Patole : नुकताच भाजपचे नेते महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी बंडखोरी करण्याचा विचार करत असलेल्यांना सज्जड दम दिला. तसेच कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी केलेल्या विधानाची बरीच चर्चा झाली. यानंतर आता काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे. ‘पक्षात शिस्त असली पाहिजे. पक्षापेक्षा स्वतःला मोठं समजणाऱ्याला पक्षात स्थान नाही. कुणी कुणाला बोललं किंवा धमकावला तर त्याच्या घरात घुसून मारू.’ असा थेट इशाराच नाना पटोले यांनी दिला आहे. भंडाऱ्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यातून नाना पटोले यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या कार्यकर्ता मेळाव्याला खासदार. डॅा. प्रशांत पडोळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेही वाचा : “लाडकी बहीणपेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज”; अंबादास दानवेंचा फडणविसांवर हल्लाबोल नेमकं काय म्हणाले नाना पटोले? “काँग्रेस पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष असून पक्षापेक्षा मोठे समजणाऱ्या व्यक्तीला इथं स्थान नाही. जातीच्या आधारावर निवडणुका लढायला गेलो तर आपला सत्यानास होईल. कालपर्यंत जे झालं ते आता उद्या होता कामा नये. सर्वेमध्ये ज्या उमेदवाराचं नाव समोरील त्यांनाच काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार. कुणी कुणाला बोललं किंवा धमकावला तर त्याच्या घरात घुसून मारू.” अनेक लोक गेलेत आणि… या विधानातून नाना पटोले यांनी पक्षाच्या वतीने सर्वेतून ज्या उमेदवाराचे नाव समोर येईल, त्यांनाच संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच भाजपने दिलेल्या काँग्रेसमुक्त भारत याबाबत नाना पटोले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, नरेंद्र मोदींच्या भाजपात काँग्रेसचे अनेक लोक गेलेत आणि आता काँग्रेसयुक्त भाजप झाली आहे. त्यामुळे अनेक आलेत अनेक गेलेत. मात्र काँग्रेस पक्ष संपू शकला नाही. निवडणुकीच्या तयारीला लागा आगामी काळत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाविकास आघाडीतील घटक पक्षांसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. राज्यात महायुतीची सत्ता आहे, स्थानिक पातळी मजबूत करण्यासाठी मोठी आखणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे, त्यामुळेच काँग्रेसनेही जोरदार तयारी केली आहे. या मेळाव्यातून नाना पटोले यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. हेही वाचा: महिला डॅाक्टर प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर पोलिसांच्या ताब्यात; मित्राच्या फार्महाऊसमधून आवळल्या मुसक्या, पहाटे काय घडलं?